‘अभियांत्रिकी’ला घरघर! फक्‍त 45 टक्‍के प्रवेश

राज्यातील महाविद्यालये संकटात; 63,680 जागा यंदा अजूनही रिक्‍तच

पुणे – गेल्या पाच वर्षापासून अभियांत्रिकी प्रवेशाला लागलेली घरघर यंदाच्या शैक्षणिक वर्षातही कायम आहे. त्यातच करोनामुळे उद्‌भवलेल्या आर्थिक अडचणींच्या कारणाने अनेक विद्यार्थी अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ शकले नाहीत. त्यामुळे प्रवेशाची संख्या आणखी घटली आहे. यंदा अभियांत्रिकीच्या 63 हजार 680 जागा रिक्‍त असल्याची माहिती राज्य सीईटी सेलने दिली आहे. या रिक्‍त जागांची संख्या जवळपास 55 टक्‍के इतकी आहे.

राज्य सीईटी सेलद्वारे अभियांत्रिकी पदवी आणि पदव्युत्तर पदवी, औषधनिर्माण पदवी आणि पदव्युत्तर पदवी, व्यवस्थापनशास्त्र, संगणकशास्त्र, वैद्यकीय, वास्तुकला पदवी आणि पदव्युत्तर पदवी आदी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या प्रवेश प्रक्रियेला करोनाच्या प्रादुर्भावाचा आणि मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगितीचा फटका बसल्याने प्रवेश प्रक्रिया लांबली होती.

प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांचा तपशील राज्य सीईटी सेलने नुकताच प्रसिद्ध केला आहे. यावर्षी अभियांत्रिकीसाठी प्रवेशाची क्षमता 1 लाख 40 हजार 132 इतकी होती. त्यापैकी 76 हजार 452 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. गेल्या पाच वर्षांपासून अभियांत्रिकीच जवळपास 50 ते 55 हजार जागा रिक्‍त राहत होत्या. यंदा मात्र ही संख्या 63 हजारांवर गेली आहे. त्यामुळे अभियांत्रिकी प्रवेशाची संख्या कमी होत असल्याने शैक्षणिक संस्थांनाही ही महाविद्यालये सुरू ठेवणे आव्हान बनले आहे.

करोनाचा फटका…
करोना प्रादुर्भावाचा प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया लांबली. आर्थिक अडचणींमुळे खासगी संस्थांमध्ये प्रवेश घेणे विद्यार्थी-पालकांना कठीण झाले. त्यामुळे प्रवेशसंख्या कमी झाली आहे. येत्या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया थोडी लवकर सुरू करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे राज्य सीईटी सेलच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.