कोपरगाव, (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने सोमवार दि.१९ रोजी जल्लोषात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पहाटे ५.३० वा. महामस्तकाभिषेकचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी, उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांच्यासह नगरपरिषद शिक्षण मंडळाचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद अशा एकूण ११ उभयंताच्याहस्ते महामस्तकाभिषेक, पूजन, आरती विधीवत संपन्न झाली.
विधीवत पूजा झाल्यानंतर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यगीत गायन करण्यात आले. नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारक परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, धबधबे तसेच ध्वनिक्षेपण व्यवस्था करण्यात आलेली होती.
याकरिता विद्युत अभियंता रोहित सोनवणे व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. तसेच एम.के.आढाव विद्यालयाचे बाळासाहेब विखे, मारुती काटे, नगरपरिषद शिक्षण मंडळाचे अमित पराई व नीलेश बुचकुले यांनी जयंती सोहळा पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.