शेवगाव – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव येथील सकल हिंदू समाज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. येथील बस स्थानकासमोर उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावर धर्मवीर संभाजी महाराजा यांच्या मुर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सार्वजनिक जयंती सोहळा समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था संघटनांचे प्रतिनिधी व धर्म प्रेमी नागरिकांची उपस्थिती होती. तळणी रस्त्यावरील श्री हरी महाराज घाडगे संचलित श्री कृष्ण गोशाळेतील गाईंना समितीच्या वतीने चारा वाटप करण्यात आला.
शहरातील आखेगाव रस्त्यावरील श्रीनाथ मंगल कार्यालयात उत्सव समितीच्या वतीने पार पडलेल्या रक्तदान शिबिरात 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तालुक्यातील खरडगाव येथे शिव व्याख्याते डॉ. कृषिराज टकले यांचे शंभू चरित्रावर तर बोधेगावी पुण्याच्या शिवकन्या अर्चना भोर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. संध्याकाळी शेवगावातील मिरी रस्त्यावरील काकडे विद्यालयापासून धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मुर्तीची काढण्यात आलेली भव्य मिरवणूक रात्री उशीरा पर्यंत सुरु होती.