ठाणे – पेमेंट गेटवे सेवा पुरवठादार कंपनीचे खाते हॅक करून वेगवेगळ्या बॅंक खात्यांमधून (bank hacking) गेल्या काही कालावधीत 16,180 कोटी रुपयांहून (Money fraud) अधिक रक्कम काढून घेतल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी व्यापक स्तरावर तपास सुरू केला आहे. ही फसवणूक फार पूर्वीपासून होत होती आणि महाराष्ट्रातील ठाणे शहरातील श्रीनगर पोलीस ठाण्यात एप्रिल 2023 मध्ये येथील कंपनीचे पेमेंट गेटवे खाते हॅक करून 25 कोटी रुपये लुटल्याच्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीला आला असे नौपाडा पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले. या फसवणूक प्रकरणांची व्याप्ती देशव्यापी असल्याचे सांगण्यात येत आहे.(Thane police)
पोलिसांनी तपास केला असता, ही फसवणूक 16,180 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची असल्याचे लक्षात आले आहे. या प्रकरणी काही व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात आत्तापर्यंत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेले नाही.
या प्रकरणी अमोल आंदळे, संजय सिंह, अमन केदार, समीर दीघे, जितेंद्र पांडे नावाच्या व्यक्तींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एफआयआरनुसार, जितेंद्र पांडे नावाच्या आरोपीवर मुख्य संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याने यापूर्वी बॅंकांमध्ये रिलेशनशिप आणि सेल्स मॅनेजर म्हणून 8 ते 10 वर्षे काम केले
होते.
पोलिसांना संशय आहे की या मेगा रॅकेटमध्ये बरेच आरोपी असू शकतात, त्यांचे हे फसवणुकीचे काम बऱ्याच काळापासून सुरू आहे आणि अनेक कंपन्या आणि व्यक्तींची त्यांनी फसवणूक केली असू शकते. संपुर्ण देशभरात हे प्रकार घडले असावेत असा कयास आहे.फसवणूक करून लुबाडण्यात आलेली रक्कम हजारो बॅंक खात्यांमध्ये हस्तांतरीत केली गेली आहे. पोलिसांनी या प्रकरणात संशयितांकडून अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत.