नवी दिल्ली – हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांची आज दहा वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेतून सुटका झाली. शिक्षक भरती घोटाळ्याच्या कारणावरून त्यांना ही शिक्षा झाली होती.
त्यांना तिहार कारागृहात ठेवण्यात आले होते. तेथे आज त्यांच्या सुटकेची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर ते कारागृहातून बाहेर पडले. 86 वर्षीय चौताला सध्या पॅरोलवर बाहेर होते. ते आज पुन्हा तिहार कारागृहात आले आणि त्यांनी सुटकेच्या संबंधातील औपचारिकता पूर्ण केली.
चौताला यांनी दहा वर्षाच्या शिक्षेपैकी साडेनऊ वर्षांची शिक्षा भोगली आहे. त्यामुळे त्यांच्या सुटकेत सहा महिन्यांची सूट देण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला होता. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात चौताला यांना 2013 मध्ये अटक करण्यात आली होती.
तेव्हापासून ते कारागृहात होते पण वेळोवेळी त्यांना पॅरोलही देण्यात येत होता. सध्या ते 26 मार्च 2020 पासून पॅरोलवरच बाहेर होते. करोनामुळे त्यांना हा विशेष पॅरोल मंजूर झाला होता. त्यांनी 21 फेब्रुवारी 2021 मध्ये पुन्हा कारागृहात दाखल होणे अपेक्षित होते.
पण हायकोर्टाने त्यांचा पॅरोल पुन्हा वाढवला होता. या शिक्षक भरती घोटाळ्यात त्यांचे पुत्र अजय चौताला आणि अन्य 53 जणांनाही कारावासाची शिक्षा झाली होती. त्यात आयएएस अधिकारी संजीवकुमार यांचाही समावेश होता.
सन 2000 साली हरियाणात 3206 कनिष्ठ शिक्षकांची जी भरती झाली होती त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होता. तो आरोप सिद्ध झाला आहे. त्यामुळे त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली होती.