नवी दिल्ली – राष्ट्रीय स्तरावर तिसरी आघाडी स्थापन करण्याची आग्रही भूमिका मांडणारे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनी तसे प्रयत्न सुरू केले आहेत. चौटाला यांनी 25 सप्टेंबरला एका राजकीय सभेचे आयोजन केले आहे.
त्यावेळी माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल आणि सपचे संस्थापक मुलायमसिंह यादव एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.
माजी उपपंतप्रधान देवीलाल यांची 25 सप्टेंबरला जयंती आहे. त्यानिमित्त त्यांचे पुत्र चौटाला यांनी सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे. हरियाणाच्या जिंदमध्ये होणाऱ्या त्या सोहळ्याचे स्वरूप राजकीय सभेसारखेच असेल. त्या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देवेगौडा, नितीश, मुलायम आणि बादल यांनी स्वीकारले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला आदींनाही निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, पवार आणि इतर नेत्यांची उपस्थिती अद्याप निश्चित झालेली नाही. तसे असले तरी इतर पक्षांचे बडे नेते उपस्थित राहणार असल्याने तो राजकीय सोहळा मोठ्या चर्चेचा विषय ठरणार आहे.
चौटाला यांनी काही दिवसांपूर्वी भाजप आणि कॉंग्रेसला पर्याय देण्यासाठी तिसरी आघाडी स्थापन होण्याची गरज बोलून दाखवली. त्या आघाडीच्या स्थापनेसाठी पाऊले उचलण्याचे सूतोवाचही त्यांनी केले. आता त्यांनी भाजप आणि कॉंग्रेसच्या मित्रपक्षांना साद घातली आहे. त्यामुळे तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी चौटाला सक्रिय झाल्याचे मानले जात आहे.