मुंबई – “सुपर कॉप’म्हणून आपली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न पोलीस दलातून बडतर्फ केलेले उपनिरक्षक सचिन वाझे यांने केला होता, असे राष्ट्रीय तपास संस्थेच्या आरोपपत्रात म्हटले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यामागील वाझेचा उद्देश आपली प्रतिमा उजळणे हा होता, असे या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.
या कारस्थानामध्ये ठाण्याचे उद्योजक मनसुख हिरानी हे कमकुवत ठरण्याची शक्यता वाटल्यानेच त्यांची हत्या करण्यात आली आणि हे हत्या घडवून आणण्याची जबाबदारी वाझे यांच्यावर सोपवली गेली होती, असे “एनआयए’च्या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.
अँटेलिया हिल बाहेरील स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी “एनआयए’ने गेल्या आठवड्यात वाझे आणि अन्य 9 जणांच्याविरोधात विशेष न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल केले आहे. अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार ठेवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न वाझे यांनी केला.
कार चोरीला गेल्याची तक्रार हिरेन योंनी नोंदवावी यासाठी वाझे यांनीच त्यांच्यावर दबाव आणला. अँटेलिया हिलबाहेर कार पार्क करण्यासही वाझे यांनी हिरेन यांना सांगितले होते. मात्र त्यांनी यास नकार दिला. त्यामुळे हिरेन यांची हत्या करण्यात आल्याचे या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.