पुणे – शहरात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यातच अनलॉकच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला. यावर पुणेकरांनी तोंडसुख घेतल्याने महापालिका प्रशासन जागे झाले आहे.
शहरातील ड्रेनेज तसेच जलवाहिन्यांसाठी सुरू असलेली खोदकामे तातडीने थांबविण्याचे आदेश मनपा अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी दिले आहेत.
शहरातील सर्वच पेठांमध्ये सदैव वर्दळ असते. पण, लॉकडाऊनची संधी साधत ड्रेनेज लाइन आणि जलवाहिनी टाकण्याची कामे 31 मेपूर्वी पूर्ण करून, रस्ते पूर्ववत करण्याचे नियोजन महापालिकेने आखले होते.
मात्र, या कामांत अक्षम्य दिरंगाई झाल्याने मंगळवारी शहरात चौफेर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे खोदाई तातडीने थांबवून 10 जूनपूर्वी सर्व रस्ते पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पेठांमध्ये ड्रेनेज तसेच समान पाणी योजनेच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यात बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता या बाजारपेठा असलेल्या प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे.
हे काम लॉकडाऊन असल्याने महापालिकेने हाती घेतले होते. मात्र, त्यानंतर आता मंगळवारपासून सर्व दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र, तोपर्यंत ही खोदाई तसेच रस्ते पूर्ववत करण्याची कामे सुरूच होती. परिणामी, रस्त्यांवरच पडलेल्या राडारोड्याचा सलग तीन दिवस सुरू असलेल्या पावसाने चिखल झाला आहे.
शिवाय, तो रस्त्यांवर पसरला आहे. त्यात भर म्हणून खोदलेले रस्ते पूर्ववत न केल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे मंगळवारी सकाळी शहरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
या प्रकाराबाबत नागरिक तसेच लोकप्रतिनिधींनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी तातडीची बैठक घेऊन ड्रेनेज, पथ तसेच पाणीपुरवठा विभागाची सर्व प्रकारची खोदाई तातडीने थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
ही कामे तातडीने पूर्ववत करून 10 जूनपूर्वी रस्ते कोणत्याही स्थितीत व्यवस्थित करण्याचे आदेश दिले आहेत. या कामात दिरंगाई झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही डॉ. खेमणार यांनी दिला आहे.
शहरात पावसाळापूर्व कामे ठिकठिकाणी सुरू आहेत. मागील वर्षभरात लॉकडाऊन असल्याने ही कामे करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ संबंधित यंत्रणेला मिळालेले नाही. त्यामुळे अनेक कामांना उशीर झाला. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे. याबाबत संबंधित विभाग तसेच अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून, तत्काळ कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
– मुरलीधर मोहोळ, महापौर.