- दहा शेतकऱ्यांचा सहभाग : सडवली येथील प्रकल्पास कृषी अधिकाऱ्यांची भेट
पवनानगर – पवनमावळात महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी (मावळ) व मंडळ कृषी अधिकारी काले कॉलनी यांच्या वतीने सडवली या गावांमध्ये सन 2020-21 या वर्षात प्रकल्प आधारित कृषी विस्तार कार्यक्रमांतर्गत चारसूत्री भात लागवड प्रकल्पाचे लाभार्थी शेतकरी भगवान अनंतराव साळुंके यांच्या चारसूत्री प्लॉटला भेट देऊन दत्तात्रय शेटे मंडळ कृषी अधिकारी काळे कॉलनी यांनी पाहणी, मार्गदर्शन केले.
या पाहणी दरम्यान त्याच्या सोबत नंदकुमार साबळे, धनंजय पाटील कृषी पर्यवेक्षक अश्विनी खंडागळे, कृषी सहायक उपस्थित होते. काळे कॉलनी कार्यालयांतर्गत 10 गावांमध्ये प्रकल्प राबविला जात आहे. भात प्रकल्प हा चारसूत्री लागवड पद्धतीवर आधारित असून, त्यामध्ये स्थानिक शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून 25 लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. 10 हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
चारसूत्री पद्धतीने भात लागवड केली आहे. प्रकल्पातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर 0.40 हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. प्रकल्पांतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून फुले समृद्धी भात बियाणे, आझेटोबॅक्टर, पीएसबी, बांधावर लागवडीसाठी तूर बियाणे देण्यात आली आहे.
सडवली येथे भात चारसूत्री प्लॉटला युरिया ब्रिकेट खत कशा पद्धतीने लावावे याबाबत येथील कृषी सहायक अश्विनी खंडागळे यांनी भात प्लॉटमध्ये उतरून लावून दाखवले व सविस्तर मार्गदर्शन केले.
सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढविणे, आधुनिक तंत्रज्ञान प्रगतशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रचार व प्रसार करणे, उत्पादन खर्च कमी करणे, स्थानिक शेतकरी बचत गटांना पाठबळ देणे, हा प्रकल्प राबविण्याचा मुख्य उद्देश आहे, पवन मावळ विभागात चारसूत्री भात लागवड पद्धतीने प्रकल्प राबविण्यात येत असून, 25 शेतकऱ्यांच्या 10 हेक्टर शेतावर प्रात्यक्षिकाद्वारे प्रकल्प राबविला जात आहे
– दत्तात्रय शेटे, मंडळ कृषी अधिकारी, काळे कॉलनी.चारसूत्री पद्धतीमध्ये भात रोपे कमी लागतात. भात लावणीस कमी वेळ लागतो. बियाणे कमी लागल्यामुळे बियाणे खर्चही कमी येतो. युरिया ब्रिकेट खतामुळे भाताच्या उत्पादनात 3 ते 4 पट वाढ होणार आहे. कृषी विभागाच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा आम्हा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होत आहे.
– भगवान अनंतराव साळुंके, शेतकरी.