जालंधर –पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांचा भाचे भूपिंदर सिंग ऊर्फ हनी यांना स्थानिक न्यायालयाने मनी लॉन्डरिंगप्रकरणी 11 फेब्रुवारीपर्यंत सक्तवसुली संचलनालयाची कोठडी सुनावली आहे.
पंजाबमधील वाळू उत्खनन उद्योगाशी हे प्रकरण संबंधित आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हनी यांना ईडीने 3 फेब्रुवारी रोजी अटक केली असून त्यांना आजपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. या कोठडीची मुदत संपल्यावर हनी यांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने या कोठडीची मुदत 11 फेब्रुवारीपर्यंत वाढवली.
हनी हे चरणजीतसिंग चन्नी यांच्या मेहुणीचे पुत्र आहे. गेल्या आठवड्यात त्यांना अटक झाल्यावर कॉंग्रेसने भाजपवर मुख्यमंत्री आणि त्यांच्या नातेवाईकांविरोधात “राजकीय नाटकबाजी’ करण्याचा आरोप केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल भाजप पंजाबमधील जनतेवर सूड उगवत आहे, असा आरोपही कॉंग्रेसने केला आहे. ईडीने गेल्या महिन्यात हनी आणि इतर काहीजणांवर छापे घातले होते आणि 7.9 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली. हनी यांच्याशी संबंधित असलेल्या संदीप कुमार यांच्याकडूनही ईडीने 2 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. पंजाबमधील वाळू उत्खननाची परवानगी मिळवून दिल्याबद्दल आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या, नियुक्त्यांसाठी आपल्याला ही रक्कम मिळाल्याचे हनी यांनी चौकशीदरम्यान मान्य केले आहे.