पुणे- घोरपडी रेल्वे फाटकातील पाटीवर गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मजकूरच नव्हता. फाटकावर लावण्यात आलेल्या पाटीवर हिंदी, इंग्रजी व दक्षिणेकडील भाषा दिमाखात झळकत होती. मात्र, ज्या महाराष्ट्रात मराठी भाषा प्रादेशिक भाषा आहे, तेथेच त्याला केराची टोपली दाखविली गेल्याचे दिसून आले. दरम्यान, मराठीमध्ये मजकूर नसल्याबाबत प्रसन्न जंगम या नागरिकाने तक्रार करत ही चूक रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.
या तक्रारीची तातडीने दखल घेत फाटकावर “थांबा’ हा मराठी मजकूर लिहिण्यात आला. दरम्यान, महाराष्ट्र ऑफिशियल लॅंग्वेज ऍक्ट 1964 व अमेंडमेंट ऍक्ट 2015 नुसार मराठीचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.
तसेच, राज्य सरकारने केंद्र सरकारच्या कार्यालयांसह रेल्वे प्लॅटफॉर्म, रेल्वे गाड्या, रेल्वे कार्यालय आदी ठिकाणी मराठीचा वापर करणे सक्तीचे केले असून 7 डिसेंबर 2017 रोजी याबाबत आदेशही काढला. परंतु, रेल्वे प्रशासनाने हा नियम पायदळी तुडवला असून मराठीऐवजी हिंदी व इंग्रजी मजकूर ठिकठिकाणी झळकत असल्याचे पाहायला मिळते. राज्यात तीन भाषा सूत्र असून प्रथम मराठी, मग हिंदी व इंग्रजी या क्रमानुसारच सर्व मजकूर असावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.