पुणे – स्वारगेट वाहतूक विभागांतर्गत जेधे चौक येथे मेट्रो स्थानकाचे काम सुरू आहे. मेट्रो स्थानक ते स्वारगेट एसटी स्थानकापर्यंतच्या कामासाठी पुढील आदेशापर्यंत प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीत बदल केला आहे. वाहतूक शाखेचे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी याबाबतचे आदेश दिले.
स्वारगेट वाहतूक विभागांतर्गत स्वारगेट जेधे चौकाकडून सर्व्हिस रोडने कात्रजला जाणारी वाहतूक बंद करून, उड्डाणपूल आणि बीआरटी लेनमधून व्होल्गा चौकमार्गे कात्रजकडे वळविण्यात येणार आहे.
यासह स्वारगेट जेधे चौकाकडून येणाऱ्या बसेसना कात्रज आणि इच्छितस्थळी जाण्यासाठी उड्डाणपुलाखाली पीएमपी बसथांबा केला आहे. त्यामुळे इच्छितस्थळी जाणाऱ्या पीएमपी बसेसना बीआरटी लेनमार्गे संबंधित बसथांब्याचा वापर करता येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.