पुणे – परराज्यातील मटारचा हंगाम सुरू झाला आहे. महिनाभरापूर्वी तेजीत असलेला मटार स्वस्त झाल्याने गृहिणींनी नववर्षाच्या स्वागताला मटार उसळी अथवा पनीर मटारचा बेत आखला आहे. महिनाभरापूर्वी घाऊक आणि किरकोळ बाजारात मटारचे भाव तेजीत होते. दिवाळीत किरकोळ बाजारात एक किलो मटारचे भाव दोनशे ते अडीचशे रुपयांपर्यंत होते. सध्या पंजाब आणि मध्य प्रदेशातील मटारचा हंगाम सुरू झाला असून बाजारात आवक वाढली आहे.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक फळभाजी बाजारात दररोज २० ते २५ ट्रक मटार आवक होत आहे. यामुळे दरात घट झाली आहे. घाऊक बाजारात दहा किलो मटारचे दर २५० ते ३२० रुपये दरम्यान आहेत. किरकोळ बाजारात एक किलो मटारचे दर ४० ते ५० रुपये दरम्यान आहे, असे मार्केट यार्डातील आडते विलास भुजबळ यांनी सांगितले.
मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश या राज्यात मटारची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. हा मटार वर्षातून सहा महिने उपलब्ध असतो. त्याला चांगली मागणी असते. दरम्यान, संक्रांतीला मटारच्या मागणीत वाढ होईल. मटार स्वस्त झाल्याने ग्राहकांकडून चांगली मागणी आहे, असे किरकोळ बाजारातील भाजीपाला विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.
गावरान मटारला पसंती
पुरंदर, वाई, पारनेर भागातील शेतकरी मटारची लागवड करतात. गावरान मटार चवीला गोड असतो. त्या तुलनेत परराज्यातील मटारचे दाणे आकाराने मोठे असतात. चवीतही फरक असतो. गेल्या काही वर्षांपासून परराज्यातील मटारची आवक बाजारात वाढत आहे. त्या तुलनेत गावरान मटारची लागवड कमी प्रमाणावर होते. मात्र, त्याला खवय्यांची पसंती असते.
“परराज्यातील मटारची आवक वाढली आहे. प्रक्रिया उद्योगांकडून या मटारला मागणी वाढली आहे. प्रक्रिया करून हा मटार शीतगृहात साठविण्यात येतो.”- अमोल घुले, व्यापारी मार्केट यार्ड