चंद्रपूर – भारतीय संस्कृतीत गायीला धार्मिकतेच्या दृष्टीकोणातून अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच लहान बाळाला आईच्या दूधानंतर गायीचे दूध पिण्यास दिले जाते. त्यामुळेही गायीला आईची उपमा दिली जाते म्हणजेच गो-माता म्हटले जाते. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या एका विभागाने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी 14 फेब्रुवारीला गायीला मीठी मारण्याचे आवाहन केले होते. मात्र विरोधकांच्या टीकेनंतर तो निर्णय मागे घेण्यात आला. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरातील बाजार आळीत एका दुकानात रोजच व्हॅलेंटाईन डे होत असल्याचे समोर आले आहे. गाय दररोज दुकानात येते, दुकानाचे मालक गायीला गुळ पाणी देतात आणि त्यानंतर गाय त्या दुकानमालकांना जिभेने चाटून प्रेम व्यक्त करते. सध्या या प्रसंगाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर होत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चंद्रपूर जिलह्यातील चिमूर शहरातील बाजार आळीत ओमप्रकाश जाकोटीया यांचे पूजा वस्त्र भांडाराचे दुकान आहे. या दुकानात सायंकाळी एक गाय दरवाजातून सरळ दुकानात शिरते आणि काउंटरजवळ जावून जाकोटीया यांना जिभेने चाटून गोंजारते. दुकानमालक जाकोटीया देखील त्या गायीला तेवढ्याच मायेने जवळ घेऊन प्रेम व्यक्त करतात. या गायींचा हा नित्याचा नियम आहे. हा प्रसंग पाहून अनेकांना अश्चर्य वाटते मात्र , निसर्गाच्या नियमानुसार आपण जर एकाद्यावर मनापासून प्रेम केले तर प्राणी सुद्धा तेवढेच प्रेम आपल्याला देतात याचा प्रत्यय याठिकाणी येत असल्याचे पाहायला मिळते.
गाय दुकानात आल्यानंतर जाकोटीया गायीला गुळ खायला देतात, पाणी पाजतात. मिळालेल्या माहितीनुसार ही गाय जाकोटीया यांची नसून गावातील एका शेतकऱ्याची आहे. मात्र गाय आणि जाकोटीया यांच्यात एक वेगळे नाते निर्माण झाले आहे. जाकोटीया सांगतात की, मागील अनेक वर्षांपासून आपल्या दुकानात गाय येतात. या गायींना गूळ तसेच पाणी देऊन त्यांची तहान, भूक भागविली जाते. गोमातेचे प्रेम आपल्याला मिळत असून, यातून समाधान मिळते. यामुळे दुकानाला किंवा आम्हाला कोणताही त्रास नाही.
दरम्यान, गाय आणि जाकोटीया यांची ही स्टोरी पाहिली असता एका कवितेच्या ओळी आपोआप ओठावर येतात. हंबरून वासराले चाटती जवा गाय…. तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय…