पुणे -शहर परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाऊस पडत आहे. एकाचवेळी मोजक्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडणे हे त्याचे वैशिष्ट्य ठरत असून, पुण्यात पाच जूनपर्यंत पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. बुधवारीदेखील शहरातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. यामुळे काही प्रमाणात नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सकाळी ढगाळ वातावरण आणि सायंकाळी पावसाची हजेरी, असे चित्र पाहायला मिळत आहे. बुधवारीदेखील शहरातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. यावेळी सर्वाधिक पाऊस हा वारजे, सिंहगड रस्ता आणि खडकवासला परिसरात नोंदवला गेला. या व्यतिरिक्त मध्यवर्ती भागातील पेठा, स्वारगेट, हडपसर, बाणेर-बालेवाडी, पाषाण, कात्रज या भागांतही पाऊस झाला.
यावेळी काही ठिकाणी वेगाने वारा वाहत होता, तर काही ठिकाणी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट आणि विजाही चमकत होत्या. या पावसामुळे वातावरणात काही अंशी गारवा निर्माण झाला असला, तरी अशा प्रकारच्या वातावरणामुळे आरोग्याच्या समस्या उद्भविण्याची भीती नागरिकांना सतावत आहे. या पावसामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली होती. अनेक भागांमध्ये रस्त्यांची कामे सुरू असल्याने काही प्रमाणात रस्ते निसरडे झाले होते. त्यामुळे काही भागांमध्ये वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.
शहरात झालेला पाऊस (मिमीमध्ये)
आशय मेझरमेन्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेनी घेतलेल्या नोंदीनुसार शहरात सायंकाळी 8 वाजेपर्यंत कात्रजमध्ये 5.6 मिमी, खडकवासला परिसरात 4.0 मिमी, वारजेत 7.2 मिमी, कोथरुड परिसरात 1.2 मिमी पाऊस पडला.
का पडतोय पाऊस?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांनी वाहून आणलेल्या बाष्पामुळे तसेच पूर्व मध्य अरबी समुद्रापासून उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकण या भागात एक कमी दाबाचा पट्टा कार्यरत असल्याने महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली असून, पुण्यासह राज्यात बहुतांश ठिकाणी सातत्याने पाऊस पडत आहे. राज्यातील कोकण भागात 6 जुलैपर्यंत, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांत येत्या 5 जूनपर्यंत पाऊस पडणार आहे.