पुणे -मोबाइलवर आलेला मेसेज वाचून लिंक डाऊनलोड केली. त्याच वेळी त्या ज्येष्ठ नागरिकाच्या बॅंक खात्यातून एक लाखाची रक्कम भामट्याने ऑनलाइन काढून घेतली. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “वारजे माळवाडी येथील 79 वर्षीय व्यक्तीने नाशिक येथे काही कागदपत्रे कुरिअर केली होती. ती संबंधित व्यक्तीला मिळाली नाहीत. यामुळे त्यांनी चौकशीसाठी कुरिअर कंपनीला फोन केला असता, तो उचलला गेला नाही. मात्र, त्यांच्या मोबाइलवर “कॅन आय कॉल यू बॅक लेटर’ असा मेसेज आला.
या मेसेजसोबत “हेल्प डेस्क’ हे ऍप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करण्यास सांगितले गेले. हे ऍप डाऊनलोड करुन त्यांना पाच रुपये ऑनलाइन भरण्यास सांगण्यात आले. त्यांनी पैसे भरताच त्यांच्या बॅंक खात्याचे डिटेल्स चोरुन एक लाख रुपये वर्ग करण्यात आले.’ तपास पोलीस निरीक्षक अमृत मराठे करत आहेत. दरम्यान, शहरात असे प्रकार वाढत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.