पुणे -शहरासह दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील बहुतांश जिल्ह्यांत दि. 12 ते 14 नोव्हेंबरदरम्यान पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषत: दक्षिण कोकणात जास्त पाऊस पडेल, असा अंदाज आहे. दरम्यान, शहरात थंडीतही वाढ होत आहे.
शहरात रात्री तापमानात घट आणि दिवसा काही प्रमाणात उकाड्याची जाणीव होत आहे. तापमानात होणाऱ्या चढ-उतारामुळे संमिश्र वातावरणाची अनुभूती पुणेकर घेत आहेत.
त्यातच या आठवड्यात पुन्हा एकदा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. अरबी समुद्रालगतच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तसेच हवेची चक्रीय स्थिती कार्यरत आहे. त्याचबरोबर अंदमानजवळ समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, 12 नोव्हेंबरनंतर त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या स्थितीमुळे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि बीड, रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यांत मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुण्याचे तापमान आणखी घसरले
शहर परिसरात रात्री किमान तापमानात घट होत आहे. शिवाजीनगर परिसरात बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमान 11.8 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. सरासरीपेक्षा हे तापमान तीन अंशांनी कमी होते. तर जिल्ह्यात सर्वांत कमी तापमान हवेली तालुक्यात 10.3 अंश सेल्सिअस इअत्के नोंदविण्यात आले आहे.