पुणे -धनकवडी बस थांबा… दुपारी 12 वाजण्याची वेळ… पोलिसांच्या वाहनांचा ताफा… बॉम्ब शोधक-नाशक पथक दाखल… प्रवाशांमध्ये घबराट… काय झाले याचीच चर्चा… पोलीस काहीच बोलेनात … तपास मोहीम सुरू… हे सारे पाहून काहीतरी भयानक घडले असावे असा संशय स्थानिकांनाही आला. मात्र, दहशतवादविरोधी तपासणीचा हा भाग असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
धनकवडीचा मुख्य बसथांबा नेहमीच गजबजलेला असतो. मात्र, बुधवारी प्रवाशांच्या मनात धडकी भरणारी घटना घडली. तेथे सायरन वाजवत पोलिसांचा ताफा दाखल झाला. सोबत बॉम्ब शोधक व नाशक पथकही आले. पोलिसांनी पटापट परिसराची झडती सुरू केली. पोलिसांची धावपळ पाहून प्रवाशांची आणि अन्य नागरिकांची तारांबळ उडाली.
हा शोध बस थांब्यामागे असलेल्या एका बॅगेजवळ येऊन थांबला. संशयित बॅग मिळताच पोलिसांनी परिसर मोकळा करत बस थांब्याचा ताबा घेतला. नागरिकांना दूरवर थांबण्यास सांगितले. “बीडीडीएस’ पथकाचा एक कर्मचारी बुलेटप्रूफ पेहराव करून यंत्र घेऊन बॅगेपाशी गेला.
त्याने तांत्रिक तपासणी केली. तोवर परिसरात शांतता पसरली होती. परिसरातील नागरिकही घटनास्थळी आले होते. मात्र, “बीडीडीएस’ पथकाला बॅगेत संशयित असे काहीच आढळले नाही.त्यांनी बॅग उघडून सर्वांसमक्ष तपासणी केली आणि ज्या वेगाने पोलीस आले, त्याच वेगाने ते निघूनही गेले.
पोलिसांनीच ठेवली होती बॅग
दहशतवाद व घातपात रोखण्यासाठी “ऍन्टी टेररिझम चेकिंग’चा हा भाग होता. परिसरात एक संशयित बॅग पोलिसांनीच ठेवली होती. हरिराम पवार या सजग नागरिकाने याची माहिती पोलीस यंत्रणेला दिली. यानंतर सहकारनगर पोलीस आणि “बीडीडीएस’ पथक घटनास्थली दाखल झाले. असेच चेकिंग मंगळवारी सातारा रस्त्यावरील एका मॉलमध्ये करण्यात आले होते.