पुणे – राज्यात पावसाचा जोर ओसरला असतानाच, विदर्भात मात्र पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे. पुढील चोवीस तासांत विदर्भासह मराठवाड्यात जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. तर कोकणासह मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
गेल्या चोवीस तासांमध्ये कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. उर्वरित महाराष्ट्र कोरडा होता, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. दरम्यान, पुण्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. पुणे शहर आणि परिसरात पुढील चोवीस तासांत ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता काही अंशी आहे.