चैत्रगौर आठवणीतली

आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्रपाडव्याने होते. नवचैतन्याची नवकुसुमे फुलवणारा हा चैत्र महिना सासूसुनेच्या नात्यात गोडवा निर्माण करतो. आपल्या परंपरेनुसार चैत्र शुद्ध तृतीयेला-गौरीतीजला चैत्रगौरीचे आगमन होते. तिला माहेरवाशीण म्हणून पूजण्याची अविरत परंपरा आहे. आधुनिकता कितीही कवटाळली, तरी आपली बीजे याच संस्कृतीत खऱ्या अर्थाने रुजतात, रमतात, ह्याचे या चैत्रगौरी हळदीकुंकवाच्या निमित्ताने दर्शन होते. नवचैतन्याची चाहूल घेऊन येणारा हा वसंत ऋतू. आनंदमय, नुकत्याच पालवी फुटलेल्या त्या कोवळ्या लता, झाडे खुणावत असतात. खूप सुंदर आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याचे मोहोर फुलवत चैत्रगौर येते. त्यात आंबट गोड चवींची रेलचेल, कैरीची डाळ, पन्हे, तो अत्तराचा सुगंध नववर्षाची सुरुवात सुगंधमय सुंदर चवीने करते.

भाद्रपद महिन्यात गौरीचा मुक्काम तीन दिवस असतो, तर चैत्र मासात ती माहेरवाशीण महिनाभर मुक्काम करते. चैत्र शुद्ध तृतीयेपासून वैशाख शुद्ध तृतीयेपर्यंत हा मुक्काम असतो. मोगरा, चाफा अशा सुगंधित सुमनांची सजावट, पक्वांनांचे नैवेद्य, पूजा करून या माहेरवाशिणीचे माहेरपण केले जाते. या महिन्यातील एक दिवस चैत्रगौरीचे हळदीकुंकू केले जाते. माझ्या आईकडे तर या हळदीकुंकाचा मोठा सोहळा असे. हळदीकुंकवाचे आमंत्रण सांगायला जायची आम्हा मुलींची खूप गडबड असायची. जाताना काय घालून जायचे, कोणाकोणाकडे जायचे, अशी जय्यत तयारी असे. आमंत्रणाचा तो कार्यक्रम अगदी आदल्या दिवशी रात्रीपर्यंत चालायचा. मग उद्या काय घालायचे, आरास कशी करायची, घर कसे सजवायचे, यावर चर्चा होत असे.

रात्रीच भिजत घातलेली डाळ, हरभरे यांचा सकाळी घरभर सुगंध यायचा. दुपारी आई एखाद्या सवाष्णीला माहेरवाशीण म्हणून जेवायला बोलवायची. तिला गौरीस्वरूप मानून तिची पूजा, बडदास्त करायची. जेवायला आंबट गोड कैरीचा मुरांबा, मस्त हरभरा उसळ, डाळ याचा मेनू असे.

संध्याकाळी छान आरास करून चैत्रगौर सजवली जायची. नवीन छान छान कपडे, दागिने घालून, नटून थटून तयार व्हायचे. डाळीची खिरापत वाटण्यासाठी समोरच असलेल्या पिंपळाच्या झाडाची पाने आणायची, तो सुध्दा एक वेगळाच सोहळा असे. संध्याकाळी आलेल्या सर्व सुहासिनी चैत्रगौरीची आरास पाहून कौतुक करत. त्यात आपल्या कलात्मकतेची चमक दिसून येई, मग पुढचे चार दिवस कुणाकडचे हळदीकुंकू छान झाले, कुणी काय घातले होते, अशा गप्पांना उधाण येत असे. हळदीकुंकू नकळत प्रतिष्ठेचे द्योतक बनून जायचे. कोण कसा राहतो हे समजायचे. पण त्यात ही त्याकाळी एक वेगळीच मजा असे.

दारापुढच्या छान रांगोळीपासून ते गौरीच्या आराशीपर्यंत सर्व घर सजवले जात असे. संध्याकाळ झाली, की नटलेल्या-सजलेल्या सुवासिनी यायला लागायच्या. त्यांनी माळलेले मोगऱ्याचे गजरे वातावरण अधिकच सुगंधी, आल्हाददायक करत. त्याकाळी त्याचे तितकेसे अप्रूप वाटत नसले, तरी त्याचे समाधान आत्ता करताना खरंच किती सुंदर क्षणांचे आपण भागीदार होतो, याची जाणीव होते. खरं तर हळदीकुंकू एक निमित्त असते. एकमेकींना मनापासून जोडण्याचे ते एक गोड माध्यम असते. त्या वातावरणाची जादू अवीट असते. आंबटगोड चवींच्या त्या रेलचेलीत, सुवासिक सुगंधाच्या गर्दीत, एक स्त्री म्हणून आपले अस्तित्व समर्थपणे दाखवत आपला स्नेह ,आपुलकी वृद्धिंगत करण्याचे चैत्रगौरीचे हळदीकुंकू हे एक समर्थ माध्यम होते.

संदर्भ, वातावरण बदलले असले, तरीही आज आपली परंपरा, संस्कृती जपण्याचे चैत्रगौरीचे हळदीकुंकू हे माध्यम टिकून आहेच. काळाच्या ओघात बदलूनही आपल्या मुळाशी घट्ट रोवून नववर्षाचे, नवचैतन्याचे स्वागत आपण ह्या फ्लॅट संस्कृतीतही करतोच. यावरून आपली नाळ आपल्या मातीशी जोडलेली आहे ह्याचे चित्र दिसते. जुने ते सोने असे म्हणत नवीन पिढीला ही अवीट वारसा पोहोचवणे गरजेचे आहे. शेवटी आपण दाखवू तेच जग ते बघणार, असे म्हणून मी आठवणींचा तो पदर बाजूला केला. त्याचा पोत मात्र विस्मरणात न जाण्या सारखाच. चैत्रगौरीच्या त्या बालपणीच्या आठवणी आज पुन्हा एकदा नकळत मनात तरळून गेल्या.

– मधुरा धायगुडे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.