अखेर सुमित्रा महाजन यांची लोकसभेच्या रिंगणातून माघार

नवी दिल्ली – लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या नंतर लोकसभा अध्यक्षा आणि भाजपच्या नेत्या सुमित्रा महाजन, लोकसभा निवडणूक लढवणार की नाही या बाबतचा संभ्रम आता दूर झाला आहे. लोकसभा निवडणुकीचे अंतिम पडघम वाजू लागले असताना देखील पक्षाने अद्याप पर्यंत उमेदवारी जाहीर न केल्यामुळे, नाराज होत लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी निवडणूक न लढविण्याची घोषणा केली आहे.

वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठ नेत्यांना निवडणूक रिंगणात न उतरवण्याचे धोरण भाजपने अवलंबले आहे. त्यातून आडवाणी आणि जोशी या दिग्गजांनाही उमेदवारी नाकारण्यात आली होती. अशातच इंदूरचा उमेदवार भाजपने अजून जाहीर केला नसल्याने ७५ वर्षीय महाजन यांच्या उमेदवारीबाबत तर्क-वितर्क सुरू झाले होते. महाजन या इंदूरच्या विद्यमान खासदार आहेत. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्या आठव्यांदा लोकसभेत करत आहेत.

आपल्या उमेदवारी बद्दल पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली होती, उमेदवारीचा निर्णय त्यांच्यावरच सोपविला होता. मात्र अद्याप पर्यंत कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे पक्ष नेतृत्वाला निर्णय घेता यावा याकरिता आपण स्वतःहून निवडणुकीतून माघार घेत असल्याचे सुमित्रा महाजन यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.