नवी दिल्ली – पेगॅसस प्रकरणाच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्यावेळी सरकारने सरकारकडे जी माहिती आहे ती सार्वजनिक करता येणार नाही असे प्रतिपादन केले आहे. केंद्र सरकारच्या वकिलांचे हे प्रतिपादन म्हणजे पेगॅसस या हेरगिरी सॉफ्टवेअरचा सरकारने वापर केल्याचीच कबुली आहे असे कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी म्हटले आहे.
सरकारने या सॉफ्टवेअरचा वापर केला आहे, पण कोणाच्या विरोधात केला आहे याची आपल्याला कल्पना नाहीं असेही त्यांनी म्हटले आहे. सुप्रीम कोर्टात नुकत्याच झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे आपले हे म्हणणे सादर केले होते.
त्यावर चिदंबरम यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की सरकारने हे सॉफ्टवेअर वापरले आहे की नाही याची स्पष्ट माहिती द्यावी आणि जर ते वापरले असेल तर कोणाच्या विरोधात वापरले गेले आहे हेहीं त्यांनी स्पष्ट करावे.
सरकारने या दोन प्रश्नांची उत्तरे दिली तर बाकीच्या विषयांची उत्तरे त्यातून आपोआप मिळतील असेही चिदंबरम यांनी त्यांच्या ट्विटर संदेशात म्हटले आहे. सरकार या थेट प्रश्नाला उत्तर देण्याचे का टाळत आहे, देशाला त्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत आता सुप्रीम कोर्टानेच ते प्रश्न सरकारला विचारावेत आणि कोर्ट ते विचारेल असेही ते म्हणाले.