जुनी सांगवीतील गॅस शवदाहिनी परिसरातील
पिंपळे गुरव – जुनी सांगवीतील पवना नदीच्या काठावर गॅस शवदाहिनी उभारण्यात आली आहे. प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचे रक्षण होण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील ही पहिली गॅस शवदाहिनी निर्माण केली. त्यामुळे जुनी सांगवी, नवी सांगवी, दापोडी, पिंपळे गुरव परिसरातून लोक अत्यंविधी करण्यासाठी येथे येतात. परंतु गॅस शवदाहिनी उभारून बारा वर्षे झाले तरी अजूनही या ठिकाणी काही भागात सिमेंटचे ब्लॉक बसविण्यात आले नाहीत. तसेच तारेचे कुंपन तुटले आहे. त्यामुळे अत्यंविधीसाठी येणाऱ्या नातेवाइकांची मोठी गैरसोय होत आहे. सिमेंटचे ब्लॉक व कुंपनाची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी ह क्षेत्रिय कार्यालयाला देण्यात आलेल्या निवेदनातून मनसेचे राजू सावळे यांनी केली आहे.
पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गवत झाडेझुडपे उगवत असल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात माती असल्याने चिखल होतो व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या ठिकाणी घुशी व सरपटणारे प्राणी यांचा वावर असतो. त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे यंत्रसामग्रीचे नुकसान होऊ शकते.
शवदाहिनीच्या वायर घुसी व उंदरांनी कुरतडल्यास शॉर्ट सर्किट होऊन शवदाहिनी जळू शकते. तसेच शॉर्ट सर्किट पावसाळ्यात झाले तर त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या जिवालादेखील धोका उद्भवू शकतो. तसेच तारेचे कुंपन ही तुटलेल्या अवस्थेत आहे. ते दुरुस्त करण्यासाठी स्थापत्य विभागाकडे सावळे यांनी वारंवार पाठपुरावा करूनदेखील आजपर्यंत कुठलीही उपाययोजन करण्यात आली नाही. या सर्व गोष्टींकडे पालिका प्रशासन लक्ष देत नाही. याठिकाणी काही अपघात झाल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का, असा प्रश्न सावळे यांनी उपस्थित केला आहे.