पुणे – महानगरपालिकेकडून पावसाळी तसेच विकासकामांसाठी ठिकठिकाणचे खोदकाम केले जात आहे. मात्र, खोदकामामुळे पुणे पोलिसांनी बसवलेल्या सीसीटीव्हीचे जाळे तुटत असल्याचे उघडकीस आले आहे. रस्तेदुरस्ती, पदपथासह बंदिस्त नळपाणीपुरवठा योजनेसह विविध खोदकामामुळे दिवसाला 40 ते 50 सीसीटीव्ही डिस्कनेक्ट होत आहेत. त्यामुळे सीसीटीव्हींद्वारे रेकॉर्डिंग होत नसल्यामुळे कायदा सुव्यवस्थेसह सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. शहरात मोठा गुन्हा घडल्यास सीसीटीव्हींचे चित्रीकरण मिळविताना अडथळा निर्माण होत आहे. मात्र पालिका प्रशासन यावर ढिम्म आहे.
शहरात ठिकठिकाणी रस्ते आणि पदपथ दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. खोदाईकाम करणाऱ्या ठेकेदारांकडून तत्काळ कार्यवाही केली जात नसल्यामुळे सीसीटीव्हींद्वारे रेकॉर्डिंग होत नसल्याचे दिसून आले आहे. पोलिसांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्हींची कनेक्टिविटी महत्त्वाची आहे. पोलीस प्रशासनाकडून संबंधित ठेकेदारासह महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात येतो. मात्र, त्याकडे काणाडोळा करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे परिसरात एखादा मोठा गुन्हा घडल्यास सीसीटीव्हींद्वारे होणारे रेकॉर्डिंग मिळविण्यास अडथळा निर्माण झाला आहे.
कायदा सुव्यवस्थेसाठी पुणे शहरातील विविध भागात तब्बल 1 हजार 340 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाते. त्याद्वारे पुणे पोलीस वेगवेगळे रस्ते आणि संवेदनशील ठिकाणांवर लक्ष केंद्रित करते. त्याशिवाय वाहतूककोंडी सुरळित ठेवण्यासाठीही सीसीटीव्हींची मदत घेतली जाते. रस्ते अपघात किंवा गुन्हेगाराचा माग काढण्यासाठी संबंधित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज महत्त्वाचे ठरतात. खोदकामामुळे पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कनेक्शन डिस्कनेक्ट झाल्यामुळे थेट फुटेजचे फीड मिळत नाही.
वाहन चालकांविरुद्ध कारवाईस अडथळा
सीसीटीव्हींची कनेक्टिविटी तुटत असल्यामुळे झेब्रा क्रॉसिंग, ट्रीपलसीट प्रवास, सिग्नल तोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करता येत नसल्यामुळे वाहतूक पोलिसांनाही त्रास सहन करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी निर्माण होत आहे.