सीबीएसई, आयसीएसई बोर्डाचे अंतर्गत गुण ग्राह्य धरा

अकरावी प्रवेश : पालकांची मागणी
“तो’ निर्णय अन्यायकारक ठरणार

एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना “बेस्ट ऑफ फाईव्ह’निकष लावला जातो तसेच त्यांना “अंतर्गत गुण’ दिले जातात. त्याचबरोबर त्यांना गणित आणि विज्ञानाच्या प्रात्याक्षिक परीक्षेचे गुण दिले जातात. हे गुण सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना दिले जात नाहीत. अशावेळी सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना या गुणांपासून वंचित ठेवणे अन्यायकारक ठरणार असून शासनाने याचा गांभीर्यपूर्वक विचार करावा, अशी मागणी रवी आठवले यांच्याकडून करण्यात आली आहे. 

पुणे – सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेतर्फे देण्यात आलेले अंतर्गत गुण राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अकरावी प्रवेशाच्या वेळी ग्राह्य धरण्यात यावेत, अशी मागणी पालक प्रतिनिधी आरुषी अद्वैत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

गतवर्षी अकरावीच्या प्रवेशाच्या वेळी सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण ग्राह्य धरण्यात आले होते. परंतु यावर्षी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू असताना सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण ग्राह्य धरण्यात येणार नाहीत, अशी चर्चा पसरू लागली आहे. यामुळे पालक संभ्रमात आहेत. विद्यार्थ्यांच्या ऐन प्रवेशाच्यावेळी अशाप्रकारचा निर्णय झाल्यास त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसू शकतो. त्यामुळे शासनाने पूर्वसूचनेशिवाय अशाप्रकारचा निर्णय घेऊ नये, असे मत आरुषी अद्वैत यांनी व्यक्त केले.  CBSE, ICSE Board’s internal merits remain valid

सीबीएसई बोर्डाच्या दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून त्यांनी प्रवेश प्रक्रियेचा भाग 1 पूर्ण केलेला आहे. त्यामुळे आता शासनातर्फे अंतर्गत गुण ग्राह्य न धरण्याचा निर्णय झाल्यास सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. अंतर्गत चाचणीचे 20 गुण मिळवण्यासाठी सीबीएसईचे विद्यार्थी शाळेमध्ये वर्षभर कठोर परिश्रम करतात. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे चीज होणे गरजेचे आहे. यासंदर्भात आमदार मेधा कुलकर्णी यांची भेट घेतली असून मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना भेटून निवेदन देणार असल्याचे पालक प्रतिनिधीकडून सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.