अखेर मुहूर्त मिळाला : आज मंत्रिमंडळाचा विस्तार

राधाकृष्ण विखे-पाटील, अविनाश महातेकर यांचा समावेश निश्‍चित
– विद्यमान काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्‍यता
मुंबई – अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्ण विराम मिळाला. राज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त सापडला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे रविवारी सकाळी राजभवन येथे नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. भाजपात प्रवेशाची केवळ औपचारिकता उरलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांचे तर शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्‍यता आहे. रिपाइंच्या कोट्यातून अविनाश महातेकर यांना संधी मिळणार आहे. मात्र, या विस्तारात भाजपचा विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्‍यता आहे. तर अंतर्गत आमदारांच्या नाराजीमुळे शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद घेण्याचे टाळले असल्याचे बोलले जात आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन आहे. त्यानिमित्त काही दिवसांपासून मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चा जोरात सुरू होत्या. मात्र, विस्तार होणार की नाही याबाबत निश्‍चित अशी बातमी येत नव्हती. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विस्ताराबाबत चर्चा केली व त्याचे ट्‌वीटही केले.

त्यानुसार उद्या, रविवारी 16 जून रोजी अधिवेशनाच्या निमित्ताने होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमापूर्वी सकाळी 11 वाजता राजभवन येथे शपथविधी पार पडणार आहे. रिपाइंच्या कोट्यातून अविनाश महातेकर यांचे नाव निश्‍चित झाले आहे. भाजपाकडून राधाकृष्ण विखे-पाटील तसेच शिवसेनेच्या कोट्यातून जयदत्त क्षीरसागर यांना कॅबिनेटमंत्रीपद मिळणार आहे. भाजपकडून डॉ. संजय कुटे, अतुल सावे, डॉ. अनिल बोंडे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. भाजपाच्या तीन विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळण्याचीही शक्‍यता आहे.

शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद सोडले?
शिवसेनेला यावेळी उपमुख्यमंत्रीपद मिळणार अशी चर्चा होती. ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे नाव त्यासाठी पुढे आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासाठी शिवसेनेच्या काही आमदारांनी लॉबिंग सुरू केले होते. शिवसेनेत सुरूवातीपासूनच प्रत्यक्ष जनतेतून म्हणजे विधानसभेतून निवडून आलेल्यांना मंत्रीपदासाठी संधी द्या, अशी मागणी आहे. त्यामुळे धुसफूस टाळण्यासाठी शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद सोडून त्याबदल्यात अधिकचे एक मंत्रीपद पदरात पाडून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेले जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबतच राजेश क्षीरसागर,उदय सामंत, तानाजी सावंत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

उद्धव ठाकरे अनुपस्थित राहण्याची शक्‍यता
उद्धव ठाकरे हे रविवारी शिवसेनेच्या 18 खासदारांना घेउन अयोध्येला जाणार आहेत. त्यामुळे रविवारी सकाळी होणाऱ्या शपथविधीला ते उपस्थित राहणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सकाळी शपथविधी झाल्यानंतर ते अयोध्येला प्रयाण करतील अशीही शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

यांना मिळणार संधी
राधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची खात्रीशीर माहिती सुत्रांनी दिली.

यांना मिळणार डच्चू
मंत्रिमंडळ विस्तारात फेरबदल करताना मुख्यमंत्र्यांकडून काही जणांना डच्चू मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यात पाच दिग्गजांची नावे आहेत. काही जणांवर भ्रष्टाचाराचे आरोप तर काही मंत्र्यांची कामगिरी सुमार असल्याचे कारण समोर करण्यात आले आहे. त्यात राज्यमंत्री विद्या ठाकूर, प्रवीण पोटे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, गडचिरोलीचे पालकमंत्री अंबरिश आत्राम, विष्णू सावरा यांना डच्चू मिळण्याची शक्‍यता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)