नवी दिल्ली – देशातील सर्वांत मोठा बॅंक घोटाळा करणाऱ्या एबीजी शिपयार्ड कंपनीचे माजी अध्यक्ष ऋषी आगरवाल यांची सीबीआयकडून चौकशी करण्यात आली. त्यामुळे ते भारतातच असल्याचे निष्पन्न झाले. सीबीआयने काही दिवसांपूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे सर्वांत मोठा बॅंक घोटाळा चव्हाट्यावर आला. विविध बॅंकांना कर्जरूपाने तब्बल 22 हजार 842 कोटी रूपयांचा गंडा घातल्याचा एबीजी शिपयार्डवर आरोप आहे. तो घोटाळा उघड झाल्यापासून आगरवाल आणि इतर आरोपी असणाऱ्या तत्कालीन संचालकांचा ठावठिकाणा समजू शकला नव्हता.
अशातच सीबीआयने आगरवाल यांच्यासह नऊ आरोपींविरोधात लूकआऊट नोटिसा जारी केल्या. आरोपींना देशाबाहेर पलायन करण्यापासून रोखण्यासाठी ते पाऊल उचलण्यात आले. त्यामुळे आरोपी भारतात आहेत की देशाबाहेर याविषयी चर्चा सुरू झाली. आता आगरवाल यांची सीबीआयकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, ती चौकशी नेमकी केव्हा झाली याविषयीचा तपशील मिळू शकलेला नाही. आगरवाल यांची चौकशी त्यांच्या मुंबईस्थित निवासस्थानी करण्यात आल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले आहे. एबीजी शिपयार्डविरोधात ईडीनेही मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे त्या कंपनीमागे आता सीबीआय आणि ईडी या दोन केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे.