मुंबई – बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक सचिन वाझे यांची तुरुंगात जाऊन चौकशी करण्यास विशेष न्यायालयाने आज सीबीआयला परवानगी दिली. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या प्रकरणी सीबीआय ही चौकशी करणार आहे. वाझे यांची 15 आणि 16 फेब्रुवारीला सीबीआयच्या पथकाकडून मुंबईतील तळोजा कारागृहात जाऊन चौकशी करण्यास “एनआयए’च्या विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे.
गेल्या फेब्रुवारीमध्ये मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवणे आणि त्यानंतर कारमालक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या “एनआयए’ने सचिन वाझे यांना अटक केली आहे. सचिन वाझे यांची चौकशी करण्यासाठी सीबीआयच्यावतीने “एनआयए’च्या विशेष न्यायालयात अर्ज केला होता.
अनिल देशमुख यांचे सहकारी संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांची चौकशी करण्याची परवानगीही सीबीआयने मागितली होती. ती परवानगीही सीबीआयला मिळाली आहे.