बावधन, दि. 30 (सागर येवले) -राज्यात सत्तांतरण झाले आणि प्रभाग बदलाच्या चर्चेला उधाण आले. तीन ऐवजी चारची प्रभाग पद्धती होणार? म्हटल्यावर बहुतांश “इच्छुक’ शांत झाले. प्रभाग पद्धतींचा अधांतरी निर्णय आता “इच्छुकां’साठी धगधगत्या निखाऱ्यांवरून चालण्यासारखा झाला आहे. जुना-नवा प्रभाग सोयीचा की अवघड, अशी कसरत करीत “इच्छुकां’ना सावध वाटचाल करावी लागत आहे.
विशेषत: नव्याने समाविष्ट झालेले बावधन बुद्रुक गाव हे पाषाण, सुतारवाडीला जोडून प्रभाग तयार करण्यात आला, त्यामुळे या भागात “इच्छुकां’कडून बैठका, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिर, राजकीय सभा यांची रेलचेल सुरू होती. मात्र, आता प्रभाग चारचा झाल्यावर बावधन बुद्रुक गाव हे कोणत्या प्रभागाला जोडणार याची शाश्वती नसल्यामुळे इच्छुकांची “रेलचेल’ थांबली.
पूर्वीचा प्रभाग क्र.10 मध्ये भुसारी कॉलनी, वेदभवन आणि बावधन खुर्द या भागाचा समावेश होता. तर, बावधन बुद्रुक हे ग्रामीण भागात होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये नव्याने समाविष्ट गावांमध्ये बावधन बुद्रुक याचा समावेश करण्यात आला. त्यामुळे महापालिका निवडणुकीत तीनच्या प्रभागाचा आराखडा तयार करताना हे गाव पूर्वीच्या प्रभागाला न जोडता, पाषाण-सुतारवाडी आणि बावधन बुद्रुक असा स्वतंत्र 14 नंबरचा प्रभाग तयार करण्यात आला. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपमध्ये तर डझनभर इच्छुक झाले. शिवसेना, मनसे आणि कॉंग्रेसकडूनही इच्छुक वाढले. सत्तांतरापूर्वी इच्छुकांकडून बावधनसह पाषाण आणि सुतारवाडीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिर, खेळ पैठणीचा, तिर्थक्षेत्रासह अन्य देवदर्शन यात्रा मतदारांना मेजवानी सुरू झाली. परंतू, सत्तांतरण होताच प्रभाग पद्धती बदलावरून चर्चा सुरू झाली मेजवानीचे कार्यक्रम थांबवत “इच्छुक’ आता “व्हेट ऍन्ड वॉच’ भूमिका घेत शांत झाले.
… त्यानंतर “इच्छुक’ ऍक्टीव्ह
कार्यक्रम घ्यायचा म्हटल्यावर तो कोणत्या परिसरात घ्यायचा? असा प्रश्न इच्छुकांसमोर पडला आहे. कारण, ज्या परिसरात कार्यक्रम घ्यायचा तो परिसर प्रभागाला जोडलाच नाही तर? खर्च आणि मेहनतीचे काय अशी द्विधा मन:स्थिती “इच्छुकां’ची झाली आहे. त्यामुळे सध्या सर्व कार्यक्रम, तिर्थयात्रा बंद असून केवळ गाठीभेटींवर इच्छुकांनी जोर दिला आहे. त्यामुळे प्रभागाचे चित्र स्पष्ट झाल्यावर मागील काही महिन्यांपासून “डिऍक्टीव्ह’ असलेले इच्छुक त्यानंतर “ऍक्टीव्ह’ होतील असे दिसते.
चारचा प्रभाग झाल्यानंतर…
बावधन बुद्रुक गाव हे पाषाण-सुतारवाडीला जोडणार की वेदभवन-भुसारी कॉलनीला जोडणार? कारण, तीनच्या प्रभाग पद्धतीमध्ये वेदभवन-भुसारी कॉलनी आणि बावधन खुर्दचा काही भाग प्रभागामध्ये समाविष्ट झाला आहे. चारच्या प्रभागामध्ये संपूर्ण बावधन समाविष्ट करण्याची शक्यता अधिक आहे. कारण, पूर्वीच्या प्रभाग 10 मध्ये चारही नगरसेवक भाजपचे होते. महाविकास आघाडी काळात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांना सोयीचा प्रभाग करून घेतला. मात्र, आता भाजप-शिंदे गट सरकार आले. भाजपचे नगरसेवक त्यांना सोयीचा भाग म्हणून बावधन बुद्रुकचा प्रभागामध्ये समावेश करून घेतील.