मुंबई – एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे पाय आणखी खोलात जाताना दिसत आहेत. आधी एनसीबीचा पंच प्रभाकर साईलने खंडणीचे आरोप केल्यानंतर मलिक यांनी देखील वानखेंडेवर आरोप केले होते. वानखेडेंनी 26 प्रकरणात खोट्या कारवाई केल्याचा दावा मलिक यांनी केला होता. आता आणखी एक साक्षीदार समोर आला असून त्याने खळबळजनक खुलासा केला आहे.
शेखर कांबळे असं या साक्षीदाराचं नाव आहे. नायजेरियन वरील कारवाईत आपल्या देखील ब्लँक पेपरवर स्वाक्षऱ्या घेतल्याचा दावा शेखरने केला आहे. तसेच कारवाईच्या नावावर दुसऱ्याच नायजेरियन व्यक्तीला पकडल्याचं शेखरने सांगितलं. तो माध्यमांशी बोलत होता.
दरम्यान आपण स्वाक्षऱ्या आणि नायजेरियन व्यक्तीसंदर्भात एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावर ते म्हणाले की, तु कोणाला काही बोलू नको. उद्या ऑफीसमध्ये ये, तिथं आम्ही सांगू तुला काय बोलायचं, असंही शेखरने नमूद केलं.
मला समीर वानखेडे यांचे नेहमी फोन यायचे. मागील 10 ते 15 दिवसांत त्यांचा फोन नाही. इतर अधिकाऱ्यांचेही फोन येत नाहीत. आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असून जे सत्य आहे ते सांगेल, असंही शेखरने नमूद केलं आहे.