Malaysia Masters 2024 & PV Sindhu : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची (P. V. Sindhu) दोन वर्षांची विजेतेपदाची प्रतीक्षा आणखी लांबणीवर पडली आहे कारण तिला रविवारी मलेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या ‘वांग शी यी’ (Wang Zhi Yi ) कडून पराभव पत्करावा लागला. दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती सिंधूने सामन्यातील निर्णायक गेममध्ये 11-3 अशी मोठी आघाडी घेतली होती. तरीही तिला 21-16, 5-21, 16-21 असा पराभव पत्करावा लागला.
-सिंधूने पहिला गेम 21-16 असा जिंकला
-दुसऱ्या गेममध्ये चीनच्या वांग झी यी हिचा 21-5 असा विजय
-तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये वांग हिचा 21-16 असा विजय
भारताची स्टार महिला शटलर पीव्ही सिंधूचा विजेतेपदाचा दुष्काळ दोन वर्षांपासून कायम आहे. सिंधू रविवारी मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदापासून वंचित राहिली. एक तास 19 मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात चीनची द्वितीय मानांकित खेळाडू वांग शी यीने पहिला गेम गमावूनही पीव्ही सिंधूला जेतेपदापासून वंचित ठेवले. सिंधूने शेवटची सिंगापूर ओपन स्पर्धा 2022 मध्ये जिंकली होती. तेव्हापासून ती दुखापती आणि खराब फॉर्ममुळे त्रस्त आहे. पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी सिंधूच्या हातातून निसटलेले जेतेपद तिला विचार करायला भाग पाडते.
हेड-टू-हेड आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, सिंधूचा वांगविरुद्ध चार सामन्यांतील हा दुसरा पराभव आहे. पाचव्या मानांकित सिंधूने पहिला गेम जिंकला आणि त्यानंतर वांग झी यीने दुसरा गेम आपल्या नावावर केला. यानंतर या सामन्याच्या अंतिम आणि निर्णायक गेममध्ये सिंधूने प्रतिस्पर्ध्याला कडवी झुंज दिली पण शेवटी तिला पराभवाला सामोरे जावे लागले.
सिंधूने सिंगापूर ओपन 2022 मध्ये फायनलमध्ये ‘वांग झी यी’ हिचा पराभव करून तिचे शेवटचे BWF वर्ल्ड टूर विजेतेपद जिंकले होते, मात्र यावेळेस सिंधूचे विजेतेपदाचे स्वप्न अपूर्ण राहिले. पीव्ही सिंधू आता इतर शीर्ष भारतीय बॅडमिंटन स्टार्ससह, आता सिंगापूर ओपन 2024 मध्ये ऍक्शनमध्ये दिसणार आहे.