तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – बनावट दस्त नोंदणी प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना तळेगाव दाभाडे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात घडली.
महेंद्र राघो गंगावणे (वय 50, रा. चिखली, पुणे) यांनी सोमवारी (दि. 19) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भीमराव विष्णू वाघमारे, नामदेव विष्णू वाघमारे, उमाजी उर्फ उमेश विष्णू वाघमारे आणि एक महिला आरोपी (सर्व रा. डोणे, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना 26 जून 2015 ते 2 जून 2016 या कालावधीमध्ये तळेगाव दाभाडे येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून डोणे गावातील गट क्रमांक 153 येथील 28 गुंठे जमीन मालक दत्तू सोळंके व दिलीप सोळंके हे असल्याचे माहित असताना देखील आरोपींनी जमिनीचे सहा लाख 40 हजार रुपये घेऊन दुय्यम निबंधक कार्यालय तळेगाव दाभाडे येथे खरेदीखत करून बनावट दस्त नोंदणी करत फसवणूक केली.