पुणे – महापालिकेकडून चौकांचे सुशोभिकरण करण्यासाठी विविध शिल्पे, प्रतिकृती उभारण्यात येतात. मात्र, अपुऱ्या देखभाल दुरुस्तीमुळे या रचनांची दुरवस्था होत आहे. मॉडेल कॉलनी येथील थोरात चौकात पालिकेकडून विविध वाद्यांच्या प्रतिकृती बसविल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून सुशोभित चौक पुन्हा विद्रुपच दिसत आहेत.
शहरांतील विविध चौकांत सुशोभिकरणांतर्गत पालिकेकडून विविध प्रतिकृती, शिल्पे, चित्रे, पुतळे आदी उभारले जातात. शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी उभारलेल्या साहित्याची सुरुवातीचे काहीकाळ त्याची देखभाल होते. मात्र, प्रतिकृती उभारल्यानंतर पुढील देखभालीकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे प्रतिकृतींच्या आजूबाजूला कचऱ्यासह त्यावर धुळीचे थर साचत आहेत. अनेक ठिकाणी प्रतिकृतींना तडे गेले आहेत.
परिणामी, लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या प्रतिकृती देखभाल-दुरुस्तीच्या अभावामुळे विद्रुप दिसत असल्याने या सुशोभिकरणाचा उपयोग काय, असा सवाल स्थानिकांकडून करण्यात येत आहे. मागील काही वर्षांपूर्वी मॉडेल कॉलनी परिसरातील थोरात चौकाच्या मध्यभागी पालिकेने लाखो रुपयांचा खर्च करून सतार, पखवाज, तबला, वीणा, हार्मोनिअम आदी वाद्यांच्या प्रतिकृती उभारल्या.
मात्र, या वाद्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येत नसल्याने वाद्य मोडकळीस आली आहेत. तर, वाद्याच्या आजूबाजूला कचरा पडला आहे. याशिवाय धूळदेखील साचली आहे. त्यामुळे उद्घाटनावेळी सुशोभित वाटणाऱ्या चौकाचे सौंदर्यच नाहीसे झाले आहे.