“आयएमए’ची मिक्‍सोपॅथीविरोधात निदर्शन

आयुर्वेदातील वैद्यांना "एमएस' पदवी देण्याच्या निर्णयास विरोध

 

पुणे – “देशात वेगवेगळ्या वैद्यकशाखांची गरज आहे. या प्रत्येक शाखेचा आदर आहेच. मात्र, शिक्षण एका शाखेचे घ्यायचे आणि प्रॅक्‍टिस दुसऱ्या शाखेची करायची हे योग्य ठरत नाही. आयुर्वेदातील वैद्यांना “एमएस’ पदवी दिल्याने रुग्णांच्या मनात डाक्‍टरांच्या पदवी संदर्भात संभ्रम निर्माण होईल. त्यामुळेच या मिक्‍सोपॅथीला आमचा विरोध असून, यासंदर्भातील आदेश तातडीने मागे घ्यावे,’ अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जे. ए. जयलाल यांनी मंगळवारी केली.

केंद्र सरकारच्या परिपत्रकातील भारतीय औषध केंद्रीय परिषदेच्या (सीसीआयएम) अध्यादेशानुसार पदव्युत्तर आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना 58 शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिल्या आहेत. या आदेशाच्या निषेधार्थ आयएमएने 1 फेब्रुवारीपासून देशव्यापी साखळी उपोषण सुरू केले आहे. येत्या रविवारपर्यंत (दि. 14) ते सुरू राहणार आहे. त्यात “आयएमए’चे सहा लाख सभासद तसेच “एमबीबीएस’ पदवी व पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. पुण्यातील निदर्शनस्थळाला डॉ. जयलाल यांनी भेट दिली. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे, पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. आरती निमकर, कृती समितीचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, डॉ. दिलीप सारडा उपस्थित होते.

डॉ. जयलाल म्हणाले, “आयुर्वेद हे देशातील प्राचीन वैद्यकशास्त्र असल्याने आमचा त्याला विरोध नाही. आमचा विरोध आहे तो पदव्युत्तर आयुर्वेदीक विद्यार्थ्यांना 58 प्रकारच्या शल्यचिकीत्सा करण्यास दिलेल्या परवानगीसाठी अर्थात मिक्‍सोपॅथीसाठी. आधुनिक वैद्यक शास्त्रातील वैविध्यपूर्ण शस्त्रक्रिया अपेंडीसेक्‍टामी, टान्सिलेक्‍टामी मोतीबिंदू शस्त्रक्रिया अशा शस्त्रक्रिया करण्याची आधुनिक वैद्यक शास्त्रातील जनरल सर्जननासुध्दा परवानगी नाही, मग आयुर्वेद शास्रातील पदवीधारकांना अत्याधुनिक वैद्यक शास्रातील शस्रक्रिया करण्याची परवानगी कशी दिली जाते?’

या निर्णयाच्या समर्थनार्थ देशात पुरेसे डॉक्‍टर नाहीत, असा एक युक्‍तिवाद केला जातो. मात्र, देशात डॉक्‍टरांची संख्या पुरेशी आहे. दरवर्षी हजारो डॉक्‍टर वैद्यकीय महाविद्यालयातून बाहेर पडतात. त्यापैकी काही पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेत असले तरीही उर्वरित डॉक्‍टर रुग्णसेवेसाठी उपलब्ध असतात. त्यामुळे परवानगीसाठी दिले जाणारे हे कारण अत्यंत तकलादू असल्याचेही त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.