छत्रपती संभाजीनगर – समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाल्यापासून सातत्याने अपघाताच्या दुर्घटना घडत आहेत. बुलडाणा येथील भीषण बस अपघातानंतर आज सलग तिसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. यात चालक पती ठार झाला असून पत्नी व मुलगा जखमी झाले आहेत.
या अपघातात सुशीलकुमार थोरात यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी आहेत. हा भीषण अपघात छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जयपूर-भांबर्डा शिवारात पहाटे घडला. संभाजीनगरहून जालनाच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे कार मार्गाच्या डाव्या बाजूला जवळपास 30 फूट खोल कोसळली.
त्यांच्यासोबत चार चाकीमध्ये असलेली त्यांची पत्नी व बाळ या अपघातात जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी संभाजीनगर येथे पाठवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.