मीरत (उत्तर प्रदेश) – पाच राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल गुरूवारी जाहीर होणार आहेत. त्यामुळे सर्व पक्षांच्या उमेदवारांमध्ये एकप्रकारची अस्वस्थता निर्माण झाली आहे.
हस्तिनापूर मतदार संघातील समाजवादी पार्टीचे उमेदवार योगेश वर्मा हे “इव्हिएम’च्या स्ट्रॉंग रूमवर अक्षरशः दुर्बिणीतून लक्ष ठेवून बसले आहे. या स्ट्रॉंग रूममध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत कोणतीही छेडछाड केली जाऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी या रूमवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दिवसभर 8 तासांच्या शीफ्टमध्ये दुर्बिणींमधून लक्ष ठेवले जाते आहे.
योगेश वर्मा आणि त्यांचे समर्थक स्ट्रॉंग रूमच्या बाहेर डेरा टाकून बसले आहेत. आपल्याला प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. मात्र जनादेशाच्याबाबत आपल्याला कोणताही धोका पत्करायचा नाही. त्यामुळे हे पाऊल उचलले असल्याचे वर्मा यांनी सांगितले.
“एक्झिट पोल’मध्ये उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याबद्दल विचारले असता, “पश्चिम बंगालमध्ये काय झाले? तेथेही भाजपचेच सरकार येईल असे एक्झिट पोलमध्ये म्हटले गेले होते. मात्र ममता बॅनर्जी यांना पूर्ण बहुमत मिळाले.’ असे वर्मा म्हणाले. हस्तिनापूरचा आमदार आणि उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री एकाच पक्षाचे असतात असा आतापर्यंतचा इतिहास असल्याचेही त्यांनी सांगितले.