पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी गाठीभेटीनंतर आता जाहीर प्रचाराला सुरूवात केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी कसबा विधानसभा मतदारसंघात उद्यानांमध्ये नागरिकांच्या भेटी घेत प्रचार केला.
तर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील उद्यानांमध्ये भेट देत मतदारांना साकडे घातले. लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या असतानाच; उमेदवारांकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गेले महिनाभर संघटनात्मक बांधणी आणि भेटीगाठींवर भर देण्यात येत होता. त्यानंतर आता प्रचाराचा पहिला टप्पा संपवून उमेदवारांकडून प्रत्यक्ष जाहीर प्रचारला सुरूवात करण्यात आली आहे.
त्यात उमेदवार प्रत्येक मतदारसंघात जात असून नागरिकांच्या भेटी घेत आहेत. त्यातही उद्याने, टेकडया तसेच सकाळी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकत्रित नागरीक भेटतील, अशी ठिकाणे निवडली जात आहेत. सोमवारी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या प्रभागात मुरलीधर मोहोळ यांनी प्रचार केला. तर भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोथरूड मतदारसंघात धंगेकर यांनी नागरिकांची भेट घेतली.