पुणे: पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत पहिल्या दिवशी यतीन एम (10-48-3), प्रसन्ना हजारे (14-47-3) यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर केडन्स संघाने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीला 150 धावांवर रोखून आपले वर्चस्व राखले.
या अंतिम सामन्याच्या दोन दिवसीय लढतीत पहिल्या दिवशी व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केडन्सच्या यतीन एम (48-3), प्रसन्ना हजारे (47-3), शुभम खरात (23-2), गौरव कुमकर (21-2) यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे व्हेरॉक संघाचा डाव 44.3 षटकात 158 धावांवर संपुष्टात आला. यात अद्वैत मुळ्येने एका बाजूने लढताना 75 चेंडूत 5 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 49 धावांची संयमपूर्ण खेळी केली. अद्वैत मुळ्ये यतीनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक कपिल देडगेकडे झेल बाद झाल्यानंतर श्रेयश केळकर 30, यश जगदाळे 23, यज्ञेश मोरे 16, हर्षवर्धन पवार नाबाद 12 यांनी धावा काढून थोडासा प्रतिकार केला.
याच्या उत्तरात केडन्स संघाने पहिल्या डावात आज दिवस अखेर 46 षटकात 4 बाद 109 धावा केल्या. यात तेजस बांदल (14 धावा) व प्रद्युम्न चव्हाणने 52 चेंडूत 25 धावा या सलामीच्या जोडीने 87 चेंडूत 41 धावा करून संघाला चांगली सुरुवात करून दिली.
हे दोघेही बाद झाल्यानंतर गौरव कुमकरने 64 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 27 धावा व ऋषी राऊत (नाबाद 25 धावा) यांनी चौथ्या गड्यासाठी 101 चेंडूत 32 धावांची भागीदारी केली. अजून शुभम खरात नाबाद 4 धावा व ऋषी राऊत नाबाद 25 धावांवर खेळत आहे. व्हेरॉक व केडन्स यांच्यातील लढतीचा अजून एक दिवसाचा खेळ बाकी आहे.