पुणे -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी 90 अर्ज आले असून, अर्जाची छाननी सुरू आहे. आठभरात पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुलाखती होतील आणि मे अखेरपर्यंत नव्या कुलगुरुंची निवड होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे एकीकडे नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची कुलगुरू निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेलाही आता वेग आला आहे.
डॉ. नितीन करमळकर यांचा कुलगुरू पदाचा कार्यकाळ मे 2022 मध्ये संपला. त्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे सोपवण्यात आला. महाविकास आघाडी सरकारने विद्यापीठ कायद्यात केलेल्या बदलांना राज्यपालांनी मान्यता न दिल्याने कुलगुरू निवड प्रक्रिया रखडली होती. राज्यात जुलैमध्ये सत्तांतर झाल्यानंतर राज्य शासनाने विद्यापीठ कायद्यातील प्रस्तावित बदल रद्द केले. त्यानंतर कुलगुरू निवड शोध समिती सप्टेंबरमध्ये नियुक्त करण्यात आली. त्यानंतर कुलगुरू पदासाठी अर्ज मागविण्यात आले. अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 मार्च होती.
कुलगुरूपदासाठी प्राप्त एकूण 90 अर्जामध्ये पुणे विद्यापीठात कार्यरत असलेल्या प्राध्यापकांचा समावेश आहे. या सर्व अर्जाची छाननी सध्या समितीकडून सुरू आहे. आठवड्यानंतर या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना ई-मेलद्वारे कळविण्यात येणार आहे. त्यानंतर मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
शैक्षणिक सत्रापूर्वी नवे कुलगुरू
यंदाचे शैक्षणिक सत्र 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वीच मे महिन्यातच नव्या कुलगुरूंची निवड होणार असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळातून होत आहे. त्याचबरोबर नव्या कुलगुरूपदी पुणे विद्यापीठातील व्यक्तीची निवड होणार का? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.