मुंबई – शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर अभिषेक सोहळ्यासाठी स्पीड पोस्टने निमंत्रण पाठवण्यात आले आहे. अगदी आयत्यावेळी उद्धव ठाकरेंना निमंत्रण पाठवून त्यांना ज्या पद्धतीने वागणूक दिली गेली त्यावर त्यांच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार आगपाखड केली आहे.
ते म्हणाले की, ते प्रभू रामाची पूजा करतात पण त्यांचे वागणे रावणासारखे आहे. प्रभू राम तुम्हाला शाप देतील. सर्व चित्रपट कलाकारांना आमंत्रित केले आहे परंतु या मंदिराच्या चळवळीशी अगदी जवळचा संबंध असलेल्या ठाकरे कुटुंबाला अशी वागणूक दिली गेली आहे.
दरम्यान आधी जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार उद्धव ठाकरे सोमवारपासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येणार आहेत.ते तेथील काळाराम मंदिरात प्रार्थना करतील आणि सोमवारी गोदावरी नदीच्या काठावर महाआरती करतील. मंगळवारी ते नाशिकमध्ये पक्षाच्या दिवसभराच्या अधिवेशनात सहभागी होणार आहेत.
“प्राणप्रतिष्ठा” कार्यक्रमासाठी सात हजार लोकांना निमंत्रीत करण्यात आले आहे. त्यात बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन, उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी आणि स्पोर्टिंग आयकॉन सचिन तेंडुलकर यांचा समावेश आहे. समारंभासाठी आमंत्रित केलेल्या जवळपास सर्व विरोधी नेत्यांनी समारंभास उपस्थित राहण्यास नकार दिला आहे, काँग्रेसने याला भाजप-आरएसएसचा कार्यक्रम म्हटले आहे.