पुणे – आचारसंहिता लागल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसवर शासकीय योजनांच्या जाहिराती काढण्यात आल्या आहेत. मात्र, त्या चिटकविताना दक्षता न घेतल्याने बहुतांशी बसचे नंबर गायब झाले आहेत.
पीएमपी बसवर शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी जाहिराती चिटकविल्या जातात. अनेकदा या जाहिराती बसच्या नंबरवर लावल्या जात असून कालांतराने जाहिरातीचे पोस्टर निघाल्यानंतर नंबरही पुसून जातो. यामुळे पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनाही बस कोणत्या डेपोची हे समजत नसल्याने संभ्रम निर्माण होत आहे. या जाहिरातीमुळे बसचा रंगही जात आहे. एकीकडे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना दुसरीकडे बस जाहिरातींमुळे विद्रुप दिसत आहे.
पीएमपीच्या जाहिराती बहुतांशी जुन्या बसेसवर चिटकविण्यात आल्या आहेत. नव्याने आलेल्या बस अद्यापही शासकीय जाहिरातीच्या विळख्यात आलेल्या नाहीत. या बस वाचविण्यासाठी पीएमपीने ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे. शहरात जुन्या बसची अवस्था बिकट झाली आहे. नव्या बस सुस्थितीतच ठेवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. याबाबत शंकर पोफळे म्हणाले, पीएमपी सार्वजनिक वाहतूक सेवा देत असल्याने बस व्यवस्थित ठेवण्याची गरज आहे. मात्र, शहरातील अनेक बस शासकीय जाहिरातींमुळे विद्रुप दिसत आहेत. लाखो रुपये खर्च करून बस घेतल्यानंतर शासकीय योजनांची जाहिरात बसवर लावणे चुकीचे आहे.