नवी दिल्ली – हरियाणात एका सहा वर्षीय मुलीच्या पोटातून डाॅक्टरांनी शस्त्रक्रिया करून तब्बल दीड किलो वजनाचा केसांचा गोळा काढला आहे. मुलीला पोटदुखीचा त्रास होत होता. तीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तपासणीत पोटात केसांचा गोळा असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर शस्त्रक्रिया करून केसाचा गोळा बाहेर काढण्यात आला.
हरियाणातील पंचकुला येथील मुलीला लहानपणापासून केस खाण्याची सवय होती. याबाबत पालकांना माहिती नव्हती. तीला पोटदुखीचा त्रास होत होता. त्यानंतर तीला सेक्टर-6 येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर मुलीच्या वैद्यकीय चाचणीनंतर पोटात केस असल्याचे आढळून आले, त्यामुळे तिला वेदना होत होत्या. ‘डेली स्टार’च्या वृत्तानुसार, बाळाच्या पोटात इतके केस कसे जमा झाले याबद्दल डॉक्टर उघडपणे काहीही बोलत नाहीत. पण ते म्हणतात की काही वेळा मुले स्वतःचे केस खातात आणि हे मानसिक स्थितीमुळे असू शकते. कदाचित या सवयीमुळे मुलीच्या पोटात 1.5 किलो केस जमा झाले असतील.
रुग्णालयाचे सर्जन डॉ. विवेक भादू यांनी सांगितले की, मुलीची प्रकृती आता ठीक आहे, मात्र तिला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून लवकरच तिला घरी सोडण्यात येईल. या यशस्वी ऑपरेशनबद्दल कुटुंबीयांनी डॉक्टरांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.