बुलढाणा – देऊळगाव राजा शहरातील रामनगर परिसरात आज एक दुर्दैवी घटना घडली. दिवाळीत खरेदी केलेली नवी कार पत्नीला शिकवत असताना ब्रेकच्या ऐवजी एक्सलेटर दबल्याने कार थेट विहिरीत कोसळली. या घटनेत पती सुखरूप बाहेर आला मात्र पत्नी आणि चिमुकली कारसह बुडाली. 70 फूट खोल विहिरीत कार कोसळली त्यात 40 फूट पाणी होते. बचाव पथकाला 6 तासानंतर कार बाहेर काढण्यात यश आले मात्र या दुर्घटनेत मायलेकीसह कारचा शोध घेण्यासाठी गेलेल्या युवकाचा अशा तिघांचा मृत्यू झाला.
स्वाती मुरकुटे, चिमुकली सिद्धी मुरकुटे आणि कार शोधण्यासाठी गेलेला पवन तोतराम पिंपळे (वय 24) अशी दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या तिघांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमोल मुरकुटे हे व्यवसायाने शिक्षक आहेत. त्यांनी दिवाळीत टाटा नेक्सन ही नवीन चारचाकी गाडी खरेदी केली होती. शाळेला सुट्ट्या असल्याने ते आज कुटुंबासोबत बाहेर फिरायला आले होते. ते पत्नी स्वाती यांना कार शिकवत होते. स्वाती या ड्रायव्हिंग सीटवर बसल्या होत्या. मात्र अचानक ब्रेकच्या ऐवजी एक्सलेटरवर दाबण्यात आले आणि काही क्षणातच कार खोल विहीरीत कोसळली. अमोल मुरकुटे हे खिडकीतून बाहेर येऊन विहिरीतून वर आले. मात्र चिमुकली आणि पत्नी स्वाती या कारसह बुडाल्या.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. यादरम्यान कारचा शोध घेण्यासाठी पवन पिंपळे विहिरीत उतरले मात्र ते गाळात फसल्याने त्यांना वर येता आले नाही. त्यानंतर कार बाहेर काढण्यास बचाव पथकाला तब्बल सहा तास लागले. अखेर सहा तासानंतर कार बाहेर काढण्यात आली. त्यामध्ये स्वाती यांचा ड्रायव्हर सीटवर सीटबेल्ट लावलेल्या अवस्थेत तर चिमुकलीचा मागील सीटवर मृतदेह आढळला. तसेच पिंपळे यांचाही मृतदेह बाहरे काढण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेने बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरात शोककळा पसरली आहे.