चांदीवरील आयात शुल्कात अडीच टक्क्याने वाढ केल्यामुळे फॅशन ज्वेलरीच्या मार्केटवर परिणाम होणार आहे. “स्टर्लिंग सिल्वर ज्वेलरी’ची किंमत वाढणार आहे. सोन्यावरील आयात शुल्कात अडीच टक्के घट केली. मात्र, त्याचवेळी सोन्यावरील उपकर अडीच टक्क्यांनी वाढून पाच टक्के केला आहे. त्यामुळे सोन्यावर एकूण आयात शुल्क 15 टक्के कायम आहे. मात्र, त्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांची याबाबत निराशा झाली. सुपर रिच करदात्यांवरील इन्कम टॅक्सचा असणारा सरचार्ज कमी केल्यामुळे गुंतवणुकीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण होईल. त्याचप्रमाणे इन्कम टॅक्स मर्यादा वाढवल्यामुळे मध्यम वर्गाच्या हातात अतिरिक्त रक्कम येणार आहे. परिणामी पर्यटन, हौसेच्या वस्तू आणि लक्झरी “एफएमसीजी’ला चांगली मागणी येण्याची शक्यता वाढली आहे.
यंदाच्या बजेटमध्ये सोन्यासाठी काही विशेष केले नाही. तर, गोल्डवर बुलियन जे आहे, त्यावर इम्पोर्ट ड्युटी वाढवली नाही. परंतु सोन्याच्या दागिन्यांवरील ड्युटी वाढवली आहे. यामुळे सामान्यांना फार फरक पडणार नाही. पण, चांदीवरील 10 टक्क्यांचा कर 15 टक्क्यांवर नेला आहे. सोन्यावरील तसेच ठेवले आहे. टॅक्स फ्री सात लाखापर्यंत करमाफ केले आहे, तर नागरिकांनी आपले सेव्हिंग्ज सोन्यात गुंतवावेत असे आवाहन आहे.
– अतुल अष्टेकर, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स
सात विभागांत हे बजेट बनवले आहे. परंतु व्यापारी फेडरेशनच्या दृष्टीने पाहिले तर काहीच केले नाही. छोटे किंवा मोठ्या व्यापाऱ्यांसाठी काहीच केले नाही. व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी कर्जाची व्यवस्था केली नाही. औद्योगिक क्षेत्रापेक्षाही महसूल देण्यात व्यापारी वर्ग मोठा आहे. परंतु व्यापाऱ्यांना काहीच फायदा नाही, केवळ उद्योजकांचे हीत पाहिले आहे. व्यापारी नाखूश आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने चांगले निर्णय घेतले आहेत. तयार दागिन्यांना “प्रमोट’ केले नाही. “लॅब ग्रोन डायमंड उद्योग’ला चालना मिळाली आहे. परंतु यामध्ये फसवणूक होऊ शकते. खऱ्या खोट्या डायमंडची पारख करणे अधिक महत्त्वाचे ठरणारे आहे.
– फत्तेचंद रांका, रांका ज्वेलर्स
यंदाचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. काळाची गरज असलेला डिस्पोजेबल उत्पन्न आणि वापर वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणाराही आहे. प्राप्तीकराच्या आघाडीवर सवलतींमुळे सहकार आणि स्टार्टअप क्षेत्राला चालना मिळेल. अर्थमंत्र्यांनी ज्येष्ठ नागरिक आणि मध्यम उत्पन्न असलेल्या वर्गाला यावेळी मदत उपलब्ध करून दिली आहे.
– एच. पी. श्रीवास्तव, उपाध्यक्ष, डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ऍड ऍग्रिकल्चर
यावर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पर्यटन क्षेत्राला दिलेले महत्त्व ही आमच्या क्षेत्रासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. युनिटी मॉलची स्थापना करून देशांतर्गत पर्यटनाला चालना देणे आणि मिशन मोडवर पर्यटनासाठी 50 शहरे विकसित करणे हे सरकारचे स्वागतार्ह पाऊल आहे. यामुळे नजीकच्या भविष्यात पर्यटन क्षेत्रात निश्चितच रोजगाराच्या भरपूर संधी निर्माण होतील. शिवाय, या क्षेत्राच्या विकासाला आणखी हातभार लागेल.
– अखिलेश जोशी, व्यवस्थापकीय संचालक, गिरीकंद ट्रॅव्हल्स प्रा. लि.