BRS announces Candidates for Vidhansabha – देशात पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपूर्वी अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. सत्ताधारी व विरोधकांसाठी लोकसभा निवडणुकांपूर्वीची ही लिटमस चाचणीचा ठरणार आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप व मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी मित्रपक्षांची जुळवाजुळव सुरु केली असून दोन्ही बाजूकडील मित्रपक्षांच्या बैठका पार पडत आहेत. तेलंगणा विधानसभेची मुदत पुढील वर्षी जानेवारीमध्ये पूर्ण होत आहेत. त्यामुळे तेलंगणातही राजकीय वारे वेगाने वाहताना दिसत आहेत. अशातच तेलंगणामध्ये सत्तेत असलेल्या भारत राष्ट्र समितीने (तेलंगणा राष्ट्र समिती) निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मोठी आघाडी घेतली आहे.
तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागा असून BRS ने ११५ जागांवरील आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री केसीआर व त्यांचे पुत्र व विद्यमान सरकारमधील मंत्री केटीआर यांच्या उमेदवारीचा देखील समावेश आहे. गोशामहल, नामपल्ली, नरसापूर, जनगाव या केवळ ४ विधानसभेच्या जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. मुख्यमंत्री केसीआर हे गजवेल आणि कामारेड्डी या दोन जागांवर निवडणूक लढवणार आहेत तर त्यांचे पुत्र केटीआर सिरिल्लामधून निवडणूक लढवतील.
तेलंगणामध्ये AIMIM सोबत युती कायम
केसीआर यांच्या बीआरएस पक्षाची एआयएमआयएम पक्षाशी युती आहे. येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये ही युती कायम राहणार असल्याचे बीआरएस पक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे. ‘आम्ही आमच्या पक्षाचा जाहीरनामा १६ ऑक्टोबर रोजी वरंगलमध्ये प्रसिद्ध करू. पक्षविरोधी कारवायांमध्ये जे कोणी सहभागी असतील, त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल.’ असं मुख्यमंत्री केसीआर यांनी स्पष्ट केलं आहे.
पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास
मुख्यमंत्री केसीआर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत ९५ ते १०५ जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला आहे. तेलंगणाच्या ११९ सदस्यीय विधानसभेची मुदत जानेवारीमध्ये पूर्ण होत असून येथे विधानसभेच्या निवडणुका या वर्षाच्या अखेरीस होणार आहेत. लोकसभा निवडणुकांपूर्वी तेलंगणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वच प्रमुख राजकीय पक्ष आपली ताकद आजमवणार असल्याचं चित्र आहे.