World Cup 2023 IND vs ENG Match Toss Update : विश्वचषक 2023 स्पर्धेतील 29 वा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील.
सलग पाच सामने जिंकून भारतीय संघ या विश्वकरंडकात विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे सिद्ध झाले असतानाच, मागील चॅम्पियन इंग्लंडसमोर आता उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्याचा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत इंग्लंड विरूध्द सामन्यात भारताचेच वर्चस्व राहिल यात कुठलीही शंका नाही. हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा(Toss) कौल इंग्लंड संघाच्या बाजूनं लागला आहे.(England win the toss and elect to bowl in Lucknow) भारताविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बटलरने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचवेळी, भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता, कारण पाठलाग करताना संघाने चांगली कामगिरी केली आहे. अशा स्थितीत संघाला स्वतःला आव्हान द्यायचे आहे. रोहितने प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. म्हणजे सूर्यकुमार यादव आणि शमी खेळताना दिसणार आहेत.
स्पर्धेत आत्तापर्यंत सुमार कामगिरी दाखवलेल्या इंग्लंड संघाचा पराभव करत गुणतालिकेत अव्वल क्रमांक गाठण्याची संधी भारतीय संघाला असणार आहे. सध्या रनरेटच्या आधारावर दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल स्थानावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सलग पाच सामने जिंकले आहेत, तर पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटची नवी व्याख्या निर्माण करणाऱ्या इंग्लंडसमोर या स्पर्धेत टिकून राहण्याची लढाई आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत भारत आणि इंग्लंड 106 वेळा आमने-सामने आले आहेत. यामधील भारताने 57 तर इंग्लंडने 44 सामन्यात विजय मिळवला आहे. दोन सामने टाय झाले असून 3 सामने अनिर्णित राहिले. वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड आठवेळा भिडले असून त्यापैकी चार सामने इंग्लंड संघाने जिंकलेत तर भारताने तीन सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला होता.