मुंबई – शाहरुखच्या “पठाण’बाबत एक एकदम नवीन बातमी समजली आहे. ही ऐकल्यावर शाहरुखच्या फॅन्सबरोबर सलमानच्या फॅन्सना देखील खूप आनंद होणार आहे. “पठाण’मध्ये शाहरुख बरोबर सलमान खान देखील असणार आहे. स्वतः सलमान खानने बिग बॉसच्या शूटिंगच्या वेळी स्पर्धक सेलिब्रिटींशी गप्पा मारताना ही माहिती दिली आहे. त्याचा रोल अगदी छोटासा पण लक्षवेधक असणार आहे.
सलमान आणि शाहरुख यांनी यापूर्वीही “करण अर्जुन’मध्ये एकत्र काम केले आहे. त्याशिवाय शाहरुखच्या “झिरो’मध्येही सलमानने छोटासा रोल केलेला आहे. त्यामुळे ही जोडी एकत्र बघण्याची ही काही पहिलीच वेळ असणार नाही. “पठाण’मधील हा छोटा रोल तो शाहरुखसाठीच करणार आहे. “पठाण’व्यतिरिक्त सलमानला “कभी ईद कभी दिवाली’ आणि “टायगर 3′ चे शूटिंगही करायचे आहे.
या शूटिंगच्या वेळापत्रकामुळेच सलमान आता “बिग बॉस-14’च्या निवेदकाच्या जबाबदारीतून स्वतःला मोकळा करून घेणार आहे. आता ही जबाबदारी दुसऱ्या कोणाच्या तरी खांद्यावर सोपवली जाणार आहे. स्पर्धकांचा निरोप घेतानाच सलमानने ही माहिती सांगितली. असे असले तरी सलमान “बिग बॉस-15’मध्ये पुन्हा असणार आहे. सध्या शाहरुख खान दुबईमध्ये “पठाण’चे शूटिंग करत आहे.