शिक्रापुरातील औरा सिटी हदरली : आतापर्यंत चौघांना लागण
शिक्रापूर- येथील औरा सिटीत मुंबईहून आलेल्या व होम क्वारंटाइन असलेल्या एकास बुधवारी (दि. 3) करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तर त्याच्या संपर्कात आलेली त्याची बहिण व भाचीला करोनाची लागण झाल्याचे शनिवारी (दि. 6) निष्पन्न झाल्याचे शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.
करोनाची लागण झाल्याने भावावर पुण्यात उपचार सुरू असताना बहिणीच्या घरातील चौघांना क्वारंटाइन करण्यात आले असताना त्याच्या बहिणीला काही त्रास जाणवत होता आणि तिच्यात करोनाबाबत काही लक्षणे आरोग्य विभागाला आढळून आली असताना आरोग्य विभागाने घरातील चौघांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह तर दोघांचा निगेटिव्ह आला आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील औरा सिटी सोसायटीमध्ये एकाच घरामध्ये तिघांना करोनाची बाधा झालेली असल्यामुळे आता नागरिक भयभीत झालेले आहे.
ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने विशेष खबरदारी घेत आरोग्य विभागाच्या वतीने या सोसायटीमध्ये सर्व्हे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. औरा सिटी सोसायटीमध्ये आजपर्यंत ऐकूण चार करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी शिक्रापूर येथील औरा सिटी सोसायटी प्रतिबंधित क्षेत्र तर शिक्रापूरपासून पाच किलोमीटरचा परिसर बफर क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.
- बाहेर गावारून आलेल्यांचा मुक्त वावर
शिरूर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी बाहेरगावारून आलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती करोनाबाधित झाल्याचे समोर आले आहे. त्यातच औरा सिटीत आतापर्यंत चार रुग्ण सापडले आहेत. तरीही शिक्रापूर येथे बाहेर गावावरून आलेल्या व्यक्तींची परिसरामध्ये मुक्तपणे वावर होत असल्याचे दिसून येत आहे, मात्र प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे कदाचित नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते.