रस्त्यात गोंधळ घालत असताना अडविल्याने केले कृत्य
सातारा(प्रतिनिधी) : सार्वजनिक ठिकाणी दुचाकी रस्त्यावर लावून गोंधळ घालणाºया दुचाकीस्वाराला अडविल्यामुळे संबंधित दुचाकीस्वाराने पोलिसालाच धक्काबुक्की केल्याचे समोर आले आहे. यामध्ये संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचा शर्ट फाटला. ही घटना दि. ५ रोजी सायंकाळी सात वाजता राजवाडा परिसरात घडली.
याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात विनायक रामचंद्र शेडगे (रा. चिपळूणकर बाग, मंगळवार पेठ, सातारा) याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, मंगळवार पेठ ते राजवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर विनायक शेडगे हा दुचाकी उभी करून गोंधळ घालत होता. यावेळी हवालदार संतोष त्रिंबके यांनी तू गोंधळ न घालता बाजूला ये, असे सांगितले असता मी बाजूला जाणार नाही, असे शेडगे याने त्यांना सांगितले.
एवढ्यावरच न थांबता ‘ तुझा काय संबंध,’ अस म्हणत हवालदार संतोष त्रिंबके यांच्या शर्टची कॉलर पकडत त्यांच्याशी झटापट केली. या झटापटीत त्रिंबके यांचा डाव्या हाताच्या बाहीपर्यंत शर्ट फाटला. या प्रकारानंतर त्रिंबके यांनी तत्काळ शाहूपुरी पोलीस ठाण्यात जाऊन विनायक शेडगे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. रात्री उशिरापर्यंत शेडगेला अटक झाली नव्हती.