टाळ, मृदुंग व अभंगवाणीच्या तालावर वधू वराची “एन्ट्री’

  • वाजंत्री नाही, बॅंड नाही अन्‌ डीजेही नाही
  • मोहितेवाडी येथील मालपोटे कुटुंबाने जपला सांप्रदायिक वारसा

वडगाव मावळ – वाजंत्री नाही, बॅंड नाही अन्‌ डीजेही नाही तर वधू – वराची एन्ट्री झाली टाळ, मृदुंग व अभंगवाणीच्या तालावर असे चित्र वडगाव मावळ येथील एका उच्चशिक्षित वधू-वराच्या लग्नात पाहायला मिळाले आणि उपस्थित वऱ्हाडीही भक्‍तीरसात न्हाहून निघाले. मोहितेवाडी येथील वारकरी संप्रदायाचा वारसा जपणाऱ्या मालपोटे कुटुंबाने यामाध्यमातून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

वडगाव मावळ येथील द्वारकाधीश मंगल कार्यालयात बीएससी केमिस्ट्री पदवीप्राप्त असलेला वर श्‍याम दत्तात्रय मालपोटे व बी.एस.सी. बायोटेक पदवीप्राप्त असलेली वधू स्वाती घनश्‍याम बनकर यांनी रुपाने मालपोटे-बनकर परिवारातील हा आगळा-वेगळा विवाह सोहळा विशेषतः करोनाच्या पार्श्‍वभूमीवर असलेले सर्व नियम पाळत डामडौल ऐवजी भक्तिमय वातावरणात साजरा झाला.
नवरदेव श्‍याम यांच्या कुटुंबाला वारकरी संप्रदायाचा वारसा असून, वडील दत्तात्रय मालपोटे हे उत्कृष्ट हार्मोनियम वादक आहेत तर चुलते संतोष मालपोटे हेही उत्कृष्ट गायक आहेत. परिसरात होणारे अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन भजन आदी कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे हा वारसा जपण्याच्या हेतूने त्यांनी मुलाच्या लग्नसोहळ्यातही संप्रदायाचा वारसा जपण्याचा निश्‍चय केला होता.

त्यानुसार लग्नसमारंभ प्रसंगी विवाहमंचावर हरिपाठ सुरू होता, वधू-वर विवाहमंचावर येताना त्यांच्यासोबत श्री विठ्ठल व संत तुकोबारायांची वेशभूषा केलेले तसेच पुढे भगव्या पताका हातात घेऊन चालणारे बालवारकरी, टाळकरी सहभागी झाले होते. विवाहमंचावर येण्यापूर्वी वधू-वराच्या हस्ते समोर मांडलेल्या विणा व मृदुंगाची पूजा करण्यात आली, त्यानंतर हा विवाह पार पडला.

माजी सरपंच भाऊसाहेब आगळमे, खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन पंढरीनाथ ढोरे, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, मावळ तालुका निवेदक संघाचे संस्थापक गणेश विनोदे यांनी यावेळी वधू-वरांना शुभेच्छा व आशीर्वाद देताना मालपोटे परिवाराने बॅण्ड, डीजेचा वापर टाळून अनोख्या पद्धतीने भक्तिमय वातावरणात लग्नसमारंभ साजरा करून समाजापुढे नवा आदर्श ठेवला असल्याचे मत व्यक्‍त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.